पोलादपूर नगरपंचायतीच्या प्रभाग 1 साठी पोटनिवडणुकीत दोन उमेदवारी अर्ज दाखल; बिनविरोध निवडीचे संकेत

पोलादपूर | शैलेश पालकर 
नगरपंचायत पोलादपूरच्या प्रभाग 1 च्या नगरसेविका व माजी नगराध्यक्षा सुनिता पार्टे यांच्या राजिनाम्यानंतर तब्बल वर्षभर रिक्त राहिलेल्या नगरसेवक पदाची पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीवेळी दोन सर्वसाधारण महिला उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत यापैकी एक अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता अधिक असल्याने बिनविरोध निवडीचे संकेत प्राप्त होत आहेत.
पोलादपूर नगरपंचायत प्रभाग क्र. 1 करिता निवडणूक निर्णय अधिकारी महाडचे तहसिलदार महेश शितोळे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनय शिपाई हे काम पाहात असून 25 मे रोजी संगिता संतोष तुरडे आणि दर्शना संदीप सावंत या दोन महिला सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली आहेत.
दि.27 मे पासून 2 जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे. मात्र, 28 मे, 30 व 31 मे रोजी ही प्रक्रिया बंद असणार आहे. नवनिर्वाचित नगरसेविकेस केवळ 5 ते 6 महिन्यांचा कालावधी मिळणार असून त्यानंतर पुन्हा तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीला नव्याने होणाऱ्या जनगणनेनुसार प्रभाग रचना आणि आरक्षणाप्रमाणे सामोरे जावे लागणार आहे. याचदरम्यान, पोलादपूर नगराध्यक्षांचा सहा महिन्यांचा कालावधी संपुष्टात येणार असल्याने हा खांदेपालटही नजिकच्या काळात होणार आहे.