पोलादपूरच्या ग्रामदैवतांचा होलिकोत्सव येत्या सोमवारपासून; 30 मार्चला पोलादपूरच्या श्रीकाळभैरवनाथांचा जत्रोत्सव

पोलादपूर | शैलेश पालकर 
पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ-जोगेश्वरीमाता यांच्या होलिकोत्सवाला येत्या सोमवार, दि. 2 मार्चपासून सुरूवात होणार असून शनिवारी भैरवनाथनगर सहाणेवर फागपंचमीला पहिली होळी पेटल्यानंतर पोलादपूरकरांमध्ये होलिकोत्सवाचे चैतन्य निर्माण झाले आहे. येत्या 30 मार्चला पोलादपूर शहरातील श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरीमातेचा  जत्रोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष बाबूराव महाडीक यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे रविवार, दि. 1 मार्च रोजी रात्री पोलादपूरकरांनी हळकुंड जमविण्यासाठी जमायचे असून  दुसऱ्या दिवशी पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ-देवी जोगेश्वरीमाता, श्रीदेव रवळनाथ, श्रीदेवी काळकाई व श्रीदेवी मरिआई पंचायतन असलेल्या देवस्थानातून सोमवारी, दि. 2 मार्चला सायंकाळी 5 वाजता श्रीदेव काळभैरवनाथ जोगेश्वरी व श्रीदेव रवळनाथांच्या पालखीचे आगमन भैरवनाथनगर सहाणेवर होणार आहे.  रात्री 12.30 वाजता होळी झाल्यावर सावंतकोंड, पार्टेकोंड आणि प्रभातनगराची जागरव्यवस्था आहे. मंगळवारी, 3 मार्चला सकाळी 9.30 वाजता धुलिवंदन होणार असून रात्री 10 वाजता काठी नाचविण्याची निशुल्क स्पर्धा होणार आहे. या रात्री गोकूळनगर, जाखमाता नगर, सैनिक नगर, यांनी जागरव्यवस्था पाहायची आहे. बुधवारी, दि. 4 मार्च 2026 रोजी रात्री 8 ते 10 वाजता भैरवनाथनगर महिला मंडळ भजन व रात्री 10 वाजता पोलादपूर शहर क्रिकेट संघटना आयोजित प्रकाशझोतातील नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा तसेच रात्री जोगेश्वरी गाडीतळ, आंबेडकर नगर, रोहिदास नगर, सिध्देश्वर आळी, सह्याद्री नगर यांच्याकडे जागर व्यवस्था राहिल. गुरूवार,दि. 5 मार्च रोजी सकाळी श्रीसत्यनारायणाची महापूजा, रात्री 9 ते 10 तांबडभुवन भजनाचे आयोजन असून रात्री तांबडभुवन, साईनाथनगर आणि गणेश नगर यांच्याकडे जागरव्यवस्था आहे. शुक्रवार, दि. 6 मार्च रोजी आदिशक्ती महिला मंडळ यांचे भजन आणि जागरव्यवस्था छत्रपती शिवाजीनगर, मठगल्ली, हनुमाननगर यांच्याकडे आहे. शनिवार, दि. 7 मार्च रोजी रात्री 11 वाजता सभा आणि रात्री 12 नंतर देवाचा गोंधळ होणार असून शहरातील सर्व नगरांकडे जागर व्यवस्था राहणार आहे. रविवारी पहाटे श्रीदेव काळभैरवनाथ जोगेश्वरी व श्रीदेव रवळनाथांच्या पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी रवाना होणार असून पालखीसोबतच पोलादपूर शहरातील सर्व नगरवासियांचा रंगपंचमी उत्सव सुरू होणार आहे.
पोलादपूर नगरीच्या भैरवनाथनगर सहाणेवरील होलिकोत्सवासह रंगपंचमीला होणाऱ्या श्रीदेव काळभैरवनाथ जोगेश्वरी व श्रीदेव रवळनाथांच्या पालखीच्या ग्रामप्रदक्षिणेला सर्व नगरवासियांनी उपस्थित राहून प्रतिसाद देण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबूराव महाडीक आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे. देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव 30 मार्च 2026 रोजी भैरवनाथ नगर सहाण परिसरामध्ये आयोजित करण्यात आल्याची माहितीही यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबूराव महाडीक यांनी दिली.