5 जुलै 2026 रोजी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे पेण शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. भोगावती नदीला आलेल्या महापुरामुळे हिमगौरी हॉटेल परिसरात अडकलेल्या सुमारे 30 ते 35 कर्मचाऱ्यांची महसूल प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी धाडसी बचावमोहीम राबवून सुखरूप सुटका केली.
पेण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. भोगावती नदीला आलेल्या महापुरामुळे हिमगौरी हॉटेलजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाण्याची पातळी छपरापर्यंत पोहोचल्याने हॉटेलमधील सुमारे 30 ते 35 कर्मचारी जीव वाचवण्यासाठी पत्र्याच्या पाईपांना धरून उभे होते. अत्यंत भीषण परिस्थितीत या घटनेची माहिती प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते कल्पेश ठाकूर यांना मिळताच आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस, पेण नगरपरिषदेचे अग्निशमन दल, सामाजिक कार्यकर्ते कल्पेश ठाकूर तसेच स्वयंसेवकांनी सेफ्टी जॅकेट, दोरखंड आणि बचाव साहित्याच्या सहाय्याने धाडसी रेस्क्यू ऑपरेशन राबवले. जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरलेल्या बचाव पथकाने सर्व अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे प्रशासन आणि बचाव पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या मोहिमेनंतर बचाव पथकाने वेळ न दवडता दूरशेत, खरोशी आणि जिते गावांकडे धाव घेत तेथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढील बचावकार्य सुरू केले. मुसळधार पावसाच्या संकटात प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल आणि स्वयंसेवकांनी दाखवलेल्या समन्वयामुळे अनेकांचे प्राण वाचले असून या कार्याबद्दल नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.