आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने ६ जुलै ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व हलक्या व जड वाहनांना राज्यातील टोल नाक्यांवर पूर्ण टोलमाफी जाहीर केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
आषाढी वारीदरम्यान राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या १० मानाच्या पालख्यांसोबत असलेल्या तसेच इतर वारकरी व भाविकांच्या वाहनांना या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, टोल नाक्यावर दिलेला टोलमाफीचा पास परतीच्या प्रवासातही वैध राहणार असून, टोलनाक्यांवर वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त आणि ‘हायवे सिक्युरिटी पेट्रोलिंग’ची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.
वारीच्या काळात राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढत असल्याने भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. प्रत्येक २० ते २५ किलोमीटर अंतरावर पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रुग्णवाहिका आणि क्रेनची व्यवस्था ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पावसाळ्यात निर्माण होणारे खड्डे तातडीने बुजविण्यासाठी आवश्यक साहित्यही उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय, परिवहन विभागाला वारकऱ्यांच्या सोयीसाठी अतिरिक्त एसटी बसेस व अन्य वाहने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो भाविकांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दिलासादायक ठरणार असल्याची भावना वारकरी संप्रदायातून व्यक्त होत आहे.