पूर्वसूचना असूनही दुर्लक्ष’; चांगू घरत यांच्या मृत्यूप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – रेवदंडा पोलिस ठाण्यात अॅड. राकेश पाटील यांची तक्रार

अलिबाग | अमुलकुमार जैन
अलिबाग–रोहा मार्गावरील वेलवली–खानाव हद्दीतील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या बगदाडामुळे झालेल्या अपघातात शेतकरी चांगू कमळू घरत यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदाराविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 च्या कलम 105 व 106 अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. राकेश पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत अॅड. पाटील यांनी म्हटले आहे की, वेलवली–खानाव परिसरातील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या बगदाडामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्याची लेखी सूचना त्यांनी अपघात होण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली होती. तसेच, अपघाताच्या दोन दिवस आधी अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना रस्ता तात्पुरता बंद करणे, वाहतूक प्रतिबंधक उपाययोजना करणे आणि इशारा फलक लावण्याच्या सूचना दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्यानेच चांगू घरत यांचा मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच संबंधित ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा दावा करत दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अॅड. राकेश पाटील यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पोलिस तपासात जे अधिकारी किंवा संबंधित व्यक्ती दोषी आढळतील, त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, या तक्रारीवर पोलीस कोणती भूमिका घेतात आणि तपासात काय निष्पन्न होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.