भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजनेंतर्गत १९ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत देशभर विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत असून, शेतकरी व कृषी संस्थांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आत्मा, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
भारत सरकारने ऑगस्ट २०२० मध्ये आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत सुरू केलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजनेद्वारे पिक काढणीनंतरच्या कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सवलतीच्या कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेमुळे शेतमालाचे मूल्यवर्धन, साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक आणि विपणनाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बँकांमार्फत मंजूर होणाऱ्या दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर तीन टक्के व्याज सवलत तसेच क्रेडिट गॅरंटीची सुविधा शासनाकडून दिली जाते.
या योजनेअंतर्गत गोदामे, शीतगृहे (कोल्ड स्टोरेज), पॅक हाऊस, ग्रेडिंग व सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, कृषी लॉजिस्टिक्स, सायलो, रिपनिंग चेंबर, ई-मार्केट सुविधा, जैव-इनपुट उत्पादन युनिट, कस्टम हायरिंग सेंटर आदी कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्राधान्य दिले जाते. वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयं सहायता गट (SHGs) तसेच इतर पात्र संस्थांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
विशेष अंमलबजावणी मोहिमेदरम्यान जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रम, शेतकरी मेळावे, कार्यशाळा, बँक समन्वय बैठका आणि लाभार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकरी व संस्थांनी तालुका कृषी अधिकारी, आत्मा (ATMA), कृषी विभाग किंवा जवळच्या राष्ट्रीयीकृत अथवा अनुसूचित बँकेशी संपर्क साधावा. तसेच https://agriinfra.dac.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्म. रायगड-अलिबाग यांनी केले आहे.