रायगड जिल्ह्यातील एका शासकीय कार्यालयात कार्यरत असल्याची चर्चा असलेल्या 37 वर्षीय महिला कर्मचाऱ्याला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लातूर येथील रणजीत मारोती कांबळे याच्याविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी यांची ओळख आंध्र प्रदेशातील रेणिगुंटा रेल्वे स्थानकाजवळील ऑटो रिक्षा स्टँड परिसरात झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने 12 जून 2026 ते 5 जुलै 2026 या कालावधीत महिलेच्या मोबाईलवर वारंवार व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल तसेच साधे फोन करून तिच्या इच्छेविरुद्ध संपर्क साधला.
त्यानंतर आरोपीने महिलेला धमकावत जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ तयार करून घेतल्याचा तसेच तिचे खासगी क्षण रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने महिलेकडून आतापर्यंत 1 हजार 500 रुपये उकळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर वारंवार अश्लील शिवीगाळ करून तिच्या स्त्रीमनाचा अवमान होईल, अशा प्रकारचे कृत्य केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे सायबर माध्यमांचा वापर करून महिलांना ब्लॅकमेल करण्याच्या वाढत्या घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील पीडित महिला रायगड जिल्ह्यातील एका शासकीय कार्यालयात विशेषतः पोलिस विभागात कार्यरत असल्याची चर्चा सुरू असली, तरी याबाबत पोलिसांनी कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.
या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत असून, आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.