रायगड स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथील एका किराणा दुकानावर धाड टाकून ₹८८,९६८ किमतीचा प्रतिबंधित केशरयुक्त विमल पान मसाला (गुटखा) जप्त केला. गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी नितेश ज्ञानेश्वर पाटील (वय ३०, रा. भोकरपाडा, ता. पनवेल) आणि दिनेश मकीजा (रा. बदलापूर) यांच्याविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाप्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, कारवाई सपोनि मानसिंग पाटील, सपोनि संदीप पाटील, पोलीस हवालदार रवी मुंडे, शरद फरांदे, रणजितसिंह खराडे आणि पोलीस शिपाई प्रदीप खरात यांच्या पथकाने पार पाडली. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना व जप्त मुद्देमाल रसायनी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.