पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; सर्वसामान्य भाविकांना सुलभ दर्शनाचा दिलासा

PEN न्यूज ऑनलाइन टीम |
पुरुषोत्तम अधिकमासाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दररोज सुमारे एक लाख भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सर्वसामान्य वारकरी आणि भक्तांना सहज, सुलभ व जलद दर्शन मिळावे यासाठी मंदिर प्रशासनाने व्हीआयपी दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सामान्य भाविकांच्या दर्शन व्यवस्थेत मोठी सुधारणा झाली असून दर्शनासाठी लागणारा वेळ तब्बल तीन तासांनी कमी झाला आहे.
मंदिर प्रशासनाच्या या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. दरवर्षी आषाढी, कार्तिकी आणि अधिकमासाच्या काळात पंढरपुरात लाखो भाविक दाखल होत असल्याने दर्शन रांगा लांबतात. अनेकदा व्हीआयपी दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याने सर्वसामान्य भाविकांच्या रांगा थांबवाव्या लागत होत्या. मात्र यंदा पुरुषोत्तम अधिकमासात व्हीआयपी दर्शन बंद ठेवल्यामुळे दर्शन व्यवस्था अधिक सुरळीत आणि शिस्तबद्ध झाली आहे.
विशेष म्हणजे, व्हीआयपी दर्शन बंद असतानाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सदाभाऊ खोत, आमदार श्रीकांत भारतीय तसेच खासदार धैर्यशील माने यांनी मंदिर प्रशासनाच्या निर्णयाचा सन्मान राखत श्री विठ्ठलाचे केवळ शिखर दर्शन घेतले. त्यांनी मंदिरातील विशेष दर्शनाची मागणी न करता सामान्य भाविकांना प्राधान्य देण्याच्या निर्णयाचे खुलेपणाने स्वागत केले.
वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर, भाविक आणि सामाजिक संघटनांनीही या निर्णयाचे कौतुक केले आहे. “विठ्ठलाच्या दरबारात सर्व भक्त समान आहेत” या भावनेला बळ देणारा हा निर्णय असल्याचे मत अनेक भाविकांनी व्यक्त केले. दर्शनासाठी कमी वेळ लागत असल्याने वृद्ध, महिला आणि लांबून आलेल्या भाविकांनाही मोठा दिलासा मिळत आहे.
पुरुषोत्तम अधिकमास संपेपर्यंत ही व्यवस्था कायम ठेवली जाण्याची शक्यता असून, यामुळे पंढरपूरच्या दर्शन व्यवस्थेचा एक आदर्श नमुना राज्यासमोर उभा राहिला आहे. सर्वसामान्य भाविकांना प्राधान्य देणाऱ्या या निर्णयामुळे विठ्ठल भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.