नेरळकरांच्या हक्काचं पाणी बिल्डरांच्या घशात

कर्जत | गणेश पवार
नेरळमध्ये वाढत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नेरळ ग्रामपंचायतीकडून नागरिकांना मिळणारे दोन वेळचे पाणीही गायब होत असल्याची तक्रार असतानाच नेरळ व ममदापूर परिसरातील काही बिल्डरांना मोठ्या प्रमाणात पाणी कनेक्शन देण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
या प्रकरणी नेरळ पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य तथा माजी सरपंच भगवान चंचे आणि नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रथमेश मोरे यांनी पुराव्यांसह ग्रामपंचायत प्रशासनाला जाब विचारत आक्रमक भूमिका घेतली.
नेरळ ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना शहरातील नागरी समस्या आणि पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. अशातच नेरळकरांना मिळणारे दोन वेळचे पाणीही बंद झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. याचदरम्यान नेरळ हद्दीबाहेरील बिल्डरांना मोठ्या प्रमाणात पाणी कनेक्शन दिल्याचा प्रकार उघड झाल्याने हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे.
भगवान चंचे आणि प्रथमेश मोरे यांनी केलेल्या पाहणीत ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील एका बिल्डरला चार पाण्याच्या लाईनचे कनेक्शन देण्यात आल्याचे समोर आले. या कनेक्शनसाठी कोणताही विकासनिधी किंवा कनेक्शन फी आकारण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित बिल्डरकडून दोन एचपीची मोटार बसवून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. बिल्डरकडून १२ लाख ५० हजार रुपये ग्रामपंचायतीला दिल्याचे सांगितले जात असले तरी त्या पैशांचे काय झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याशिवाय तुलसी कन्स्ट्रक्शनच्या प्रकल्पाला तब्बल २५ पाणी कनेक्शन देण्यात आल्याचा आरोप असून त्यासाठीही कोणताही विकासनिधी किंवा कनेक्शन फी आकारली नसल्याचे त्यांनी नमूद केले. एकूण ४२ पाणी कनेक्शन देण्यात आल्यामुळे नेरळमधील मोहाचीवाडी, खांडा आणि पायामाळ परिसरातील नागरिकांच्या हक्काचे पाणी वळवले जात असल्याचा आरोप चंचे आणि मोरे यांनी केला आहे.
तसेच द्वारका व्हॅली येथील ७० फ्लॅट्सना घरपट्टी आकारताना बिल्डरकडून ४ लाख ९० हजार रुपये घेण्यात आले असून केवळ २ लाख रुपयांचीच पावती देण्यात आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. उर्वरित २ लाख ९० हजार रुपयांचे काय झाले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
या सर्व प्रकरणांवरून चंचे आणि मोरे यांनी थेट नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सुजित धनगर आणि ग्राम अधिकारी अरुण कार्ले यांना कार्यालयात जाब विचारत बिल्डरांना दिलेली पाणी कनेक्शन रद्द करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलनही केले.
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत ग्रामअधिकारी अरुण कार्ले यांनी नेरळ पोलीस ठाण्यात संबंधित बिल्डरांविरोधात कारवाईची मागणी करणारी तक्रार दाखल केली आहे.