जुळ्या अपत्याच्या आगमनाचा आनंद मोबाईल स्टेटसवर व्यक्त केलेल्या वनरक्षकाचा काही तासांतच अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रायगड जिल्ह्यात घडली.
रेवस–रेड्डी मार्गावर खोदून ठेवलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने अलिबाग वनविभागातील तिनविरा येथे कार्यरत वनरक्षक सुरज सारंगे यांचा शुक्रवारी (दि.६) रात्री जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून वनविभागात शोककळा पसरली आहे. मुरूड तालुक्यातील सर्व्हे येथील रहिवासी असलेले सुरज सारंगे हे कर्तव्यदक्ष व मनमिळावू स्वभावाचे कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. शुक्रवारी रात्री ते दुचाकीवरून घरी जात असताना रेवस–रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान खोदलेल्या मोरीत त्यांची मोटारसायकल कोसळली. खोल खड्ड्यामुळे दुचाकीचा तोल जाऊन ते खाली पडले आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यांना जुळे अपत्य झाले होते आणि शुक्रवारीच ही दोन्ही बाळे हॉस्पिटलमधून घरी आली होती. या आनंदाचा क्षण त्यांनी मोबाईल स्टेटसद्वारे व्यक्त केला होता. मात्र काही तासांतच घडलेल्या अपघातामुळे आनंद क्षणात शोकात बदलला. दरम्यान, काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स, सूचना फलक किंवा इशारे नसल्याने निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप होत असून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.