नागोठणे एसटी बसस्थानकावर प्रवासी महिलेला पर्समधून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन महिलांना नागोठणे पोलिसांनी शिताफीने अटक केली. स्नेहल रमेश गोंधळी यांच्या पर्समधील ७.९ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. गुन्ह्याचा तांत्रिक तपास रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू केला आणि संशयित महिला रेखा संतोष टंकाई (५५) व साक्षी अरुण बंतू (३०) यांना ताब्यात घेऊन प्रारंभी एक तोळा सोने जप्त करण्यात आले.
उर्वरित दागिन्यांचा माग काढण्यासाठी नागोठणे पोलिसांचे पथक नांदेडपर्यंत रवाना झाले. चौकशीत आरोपींनी चोरी केलेले दागिने मुलाच्या उपचारासाठी पैसे हवे असल्याचे सांगून नांदेडमधील नक्षत्र ज्वेलर्स येथे विकल्याचे कबूल केले. दुकान मालक सोमेश वसंतराव राजूरकर यांनीही घटनेची पुष्टी केली. त्यानंतर दोन पंचांच्या साक्षीने ज्वेलर्सकडून साडेपाच तोळे दागिने जप्त करण्यात आले.
या संपूर्ण तपासात प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील, पोलीस हवालदार चंद्रशेखर नागावकर, महिला पोलीस नायक मयूरी पाटील व वृषाली मांटे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. नागोठणे पोलिसांनी ७.९ तोळ्यांपैकी तब्बल ६.५ तोळे सोने हस्तगत करून पीडित महिलेला मोठा दिलासा दिला असून नागरीकांकडून या अचूक, द्रुत आणि दमदार कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.