जम्मू-काश्मीरच्या राष्ट्रीय थांगता स्पर्धेत सांबरीच्या ‘दर्पण पाटील’ची चमक; ब्रॉन्झ पदकावर नाव कोरले

अलिबाग | प्रतिनिधी 
जम्मू आणि काश्मीर येथे झालेल्या ‘थांगता’ ३२व्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये अलिबाग तालुक्यातील सांबरी गावचा सुपुत्र दर्पण नितीन पाटील याने उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर ब्रॉन्झ पदक पटकावले आहे. त्याच्या या यशामुळे सांबरी गावासह परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत देशभरातून विविध खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत दर्पण पाटीलने आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करत ब्रॉन्झ मेडल मिळवले. त्याच्या या कामगिरीने त्याच्या मेहनतीला आणि सरावाला यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दर्पणच्या या यशामुळे सांबरी गावासह अलिबाग तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच क्रीडाप्रेमींकडून अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही त्याने अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करत गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.