अरबी समुद्राच्या मध्यभागी दिमाखात उभा असलेला ऐतिहासिक जंजिरा किल्ला आता अधिक सुरक्षित आणि सुलभ पर्यटन अनुभवासाठी सज्ज झाला आहे. सागरमाला योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक प्रवासी जेट्टी आणि ब्रेकवॉटर प्रकल्पाचे लोकार्पण बुधवारी दि. १३ मे रोजी सकाळी ११.३० वाजता होणार असून, या प्रकल्पामुळे जंजिरा पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तब्बल ९३.५६ कोटी रुपये खर्च करून साकारण्यात आलेला हा प्रकल्प कोकणातील सागरी पर्यटनासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
मुरूड तालुक्यातील राजपुरी किनाऱ्यालगत असलेल्या जंजिरा किल्ल्यावर दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. मात्र किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना बोटींचा आधार घ्यावा लागत असल्याने भरती-ओहोटी, समुद्रातील उंच लाटा आणि खराब हवामानामुळे अनेकदा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. विशेषतः पर्यटन हंगामात होणारी गर्दी आणि समुद्रातील अस्थिर परिस्थिती यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत होता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ब्रेकवॉटर आणि आधुनिक जेट्टी उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला होता.
ब्रेकवॉटरमुळे समुद्रातील लाटांचा थेट परिणाम कमी होणार असून, बोटींची ये-जा अधिक सुरक्षित आणि नियंत्रित पद्धतीने होणार आहे. नव्या जेट्टीवरून पर्यटकांना अधिक सुलभरीत्या चढ-उतार करता येणार असल्याने जंजिरा किल्ल्याकडे होणारा समुद्री प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. दोन महिन्यांपूर्वी या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून, अखेर आता या जेट्टीच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनील तटकरे असणार आहेत. यावेळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले , विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे खासदार श्रीरंग बारणे विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, आमदार रविंद्र पाटील,तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या प्रकल्पामुळे केवळ पर्यटकांच्या सुरक्षिततेत वाढ होणार नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागणार आहे. बोट व्यवसाय, हॉटेल उद्योग, स्थानिक मार्गदर्शक, खाद्य व्यवसाय आणि पर्यटनाशी संबंधित छोट्या व्यावसायिकांना या सुविधेचा मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. सुरक्षित जलवाहतूक उपलब्ध झाल्याने भविष्यात जंजिरा किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोकणातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, जंजिरा किल्ल्याला आता आधुनिक पर्यटन सुविधांची जोड मिळाल्याने रायगडच्या सागरी पर्यटनाला नवी ओळख मिळणार असल्याचे चित्र आहे.