माथेरानवर आणि विशेष करून समस्त ग्रामवासीयांवर निस्सीम प्रेम असणारे रायगडचे कार्यसम्राट खासदार आदरणीय सुनील तटकरे यांच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यातील रमणीय पर्यटनस्थळ असणाऱ्या माथेरानचा सर्वतोपरी कायापालट करण्यासाठी थेट नगराध्यक्ष पदाचे अनुभवी आणि कार्यतत्पर उमेदवार मा. अजय सावंत त्याचप्रमाणे अनेक वर्षे नगरपरिषदेच्या सभागृहात जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले माजी नगराध्यक्ष विवेकभाई चौधरी आणि राजकीय क्षेत्रात नव्याने पदार्पण करून सुध्दा अनेक दिग्गजांना घरचा रस्ता दाखविणारे २०१६ मध्ये त्यावेळी एकहाती सत्ता स्थापन करण्यात मोलाचे योगदान लाभलेले असे सर्व युवकांचे लाडके नेतृत्व माजी नगरसेवक प्रसादभाई सावंत ह्या त्रिमूर्ती आपल्या सर्व शिलेदारांना सोबत घेऊन सज्ज झाल्या आहेत.
लोकांना काय अभिप्रेत आहे, कोणकोणत्या समस्या भेडसावत असतात, सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या प्रश्नांची उकल कशाप्रकारे मार्गी लावता येईल, स्टोल्स धारकांना ज्या ज्या वेळी शासकीय अडचणी निर्माण होतात त्यावेळी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून गोरगरीब जनतेला त्यांचा अधिकार देण्यासाठी तसेच गावाच्या विकास कामांसाठी शासन स्तरावर निधी कसा मंजूर करून घेतला जातो ज्यामुळे गावात विकास कामे पूर्ण होऊन सर्वसामान्य लोकांना उदरनिर्वाह आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.माळी कामगारांचे प्रश्न असोत किंवा मोलमजुरी करणाऱ्या श्रमिक वर्गाच्या समस्या असोत यावर कसा तोडगा काढून कष्टकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा याबाबत इत्यंभूत माहिती अजय सावंत, विवेकभाई चौधरी आणि प्रसाद सावंत या त्रिमूर्तींना माहीत आहे.
आजही माथेरानचे पूर्णपणे शहरीकरण झालेले नाही ते खेडे वजा शहर म्हणून गणले जाते. राजकीय क्षेत्रात चढउतार येत असतात. आणि मुख्यतः या गावात कितीही उत्तम प्रकारे कामे पूर्ण करण्यासाठी पोटतिडकीने प्रयत्न करून कामे जरी प्रगतीपथावर आणली तरीसुद्धा काहिनाकाही त्रुटी काढण्यात विरोधकांना धन्यता वाटते. अशा खोडसाळ वृत्तीमुळे आलेला शासकीय निधी वापराविना माघारी जातो आणि मग डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ येते. क वर्ग नगरपरिषद असताना भरीव निधी सहजगत्या प्राप्त होत नाही. खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून अनेकदा प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत.मंत्री आदिती तटकरे यांचे सुध्दा या गावाकडे विशेष लक्ष असून गावाच्या प्रश्नांसंदर्भात या नेत्यांकडे गेल्यास मग तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो त्यांच्या अडचणी समजून घेत त्यावर मार्ग काढण्यासाठी हे तटकरे कुटुंब सदैव तत्पर असते.
अजय सावंत यांच्या समोर या गावाविषयी, हे पर्यटनस्थळ विकसनशील व्हावे यासाठी ब्लु प्रिंट तयार आहे. त्यांच्या साथीला माजी नगराध्यक्ष विवेकभाई चौधरी आणि राजकारणात दिग्गजांना वेळप्रसंगी सळो की पळो करून सोडणारे प्रसादभाई सावंत हे यावेळी अजय सावंत यांच्या खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे आगामी निवडणूक अगदी सहज निवडून येणार हे समस्त मतदारांना सुध्दा ठाऊक आहे. नुकताच दि.२५ रोजी खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी महिला वर्गाची सर्वाधिक संख्या दिसून आली होती. सर्व स्थानिक मंडळींनी चौक पूर्णपणे भरून गेला होता.
विरोधकांचे कामच आहे की चांगल्या कामाला विरोध करणे नाहीतर ठराविक लोक त्यांच्यामागे कसे येणार हाही प्रश्नच आहे.
गावामध्ये येणाऱ्या पर्यटकांची वाहतूक व्यवस्था उत्तम प्रकारे व्हावी यासाठी सुट्ट्यांच्या हंगामात पार्किंग अभावी घाटात मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते याचा इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम होत असतो त्यासाठी दस्तुरी पार्किंग मधील बोरीच्या मैदानावर बहुमजली वाहनतळ ( स्पायरल पार्किंग ) व्यवस्था आगामी काळात पूर्णत्वाला नेण्यासाठी ही त्रिमूर्ती सज्ज आहेत. बाराही महिने इथले पर्यटन बहारावे यासाठी पर्यायी मार्ग वाहतूक व्यवस्था निर्माण व्हावी ही महत्वपूर्ण बाब या मंडळींनी खासदार सुनील तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
सातत्याने काहीतरी या गावासाठी करावे याच एकमेव प्रयत्नात ही त्रिमूर्ती दिसत असून सर्व पक्षाच्या मंत्र्यांशी यांचे घनिष्ट दृढ संबंध आहेत. या त्रिमूर्तींच्या म्हणण्यानुसार विकासाचे ध्येय गाठायचे आणि प्रत्येक पाऊल जनतेसाठीच टाकायचे. आजपर्यंत आपण नगरपरिषदेच्या माध्यमातून आपल्या कार्यकाळात जनतेसाठी काम करत आलोय आणि यापुढेही काम करत राहू हेच धोरण अवलंबून गावाचे हित जोपासण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत माथेरान करांची सेवा करण्यात जो आनंद मिळतो जे सुख प्राप्त होते त्याची तुलना करू शकत नाहीत.