कोमसाप च्या रायगड जिल्हा साहित्य संमेलनाचे पाचाड येथे आयोजन !

Sahitya Sammelan
महाड ( मिलिंद माने ) : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दहाव्या रायगड जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील साहित्य रसिकांना गडावर येणाऱ्या पर्यटकांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना साहित्याची वेगळीच मेजवानी मिळणार आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद ही कोकणातील साहित्यिकांसाठी निर्माण झालेली संस्था आहे. श्रेष्ठ कवी मधु मंगेश कर्णिक यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाड शाखेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष विविध साहित्यिक उपक्रम राबवले जात आहेत, यापूर्वी केंद्रीय साहित्य संमेलन आणि जिल्हास्तरीय साहित्य संमेलने आयोजित केलेली आहेत.
यावर्षी ऐतिहासिक. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड मध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचे दहावे रायगड जिल्हा साहित्यिक संमेलन संपन्न होत आहे. दिनांक २० आणि २१ जानेवारी २०२४ या दोन दिवशी हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाच्या संदर्भात माहिती देण्याकरता आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, जिल्हा समन्वयक अ.वि.जंगम, संमेलन कार्याध्यक्ष स्नेहा गांधी, महाड तालुका अध्यक्ष गंगाधर साळवी, संध्या पोटफोडे, सौ. नगरकर, सागर मिस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते. २०२४ चे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन ऐतिहासिक पाचाड मध्ये आयोजित केलेले असून यामध्ये जवळपास ११० साहित्यिकांचा सहभाग लावणार आहे. याध्ये कवी, गझलकार कथावाचक, लेखक, कादंबरीकार आदींचा समावेश आहे. हे साहित्य संमेलन प्रथमच ऐतिहासिक स्थळी होत असून या संमेलनामध्ये जिल्ह्यातील लोकांचाच सन्मान केला जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
संमेलनाचे उद्घाटन २० जानेवारी रोजी होणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी भारती मेहता, तर उद्घाटक म्हणून नामदार अदिती तटकरे या उपस्थित राहणार आहेत. ग्रंथ दिंडी, विविध पुस्तकांचे प्रकाशन, त्याचबरोबर परिसंवाद, व्याख्यान, गझल मुशायरा, असे विविध कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केले आहे. ऐतिहासिक स्थळी होणाऱ्या या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साहित्य मेजवानीचा आनंद घ्यावा असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *