जून महिन्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाल्याने मुंबई आणि परिसरातील पाणीपुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र, रविवारपासून कोकण किनारपट्टीवर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली असून, पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. १ ते ३ जुलैदरम्यान रायगड-रत्नागिरीसह ठाणे, मुंबईला ऑरेंज अलर्ट, तर आज (२९ जून) पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीला जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने मुंबई महानगर क्षेत्रातील धरणसाठे आणि पाणीपुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. जवळपास संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष पावसाकडे लागले होते.
दरम्यान, रविवारपासून कोकण किनारपट्टीवर पावसाने पुन्हा जोर धरला असून पुढील काही दिवस पावसाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने ३ जुलैपर्यंत राज्यातील विविध भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
आज (२९ जून) पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच रायगड-रत्नागिरीसह ठाणे, मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये २९ जून ते ३ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी तसेच पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, कोकणासह घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्याबरोबरच सखल भागातील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.