रायगड जिल्ह्यातील देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या काशिद समुद्रकिनारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोहण्यासाठी समुद्रात उतरलेला २४ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्यानंतर तब्बल पंचवीस तासांच्या शोधमोहीमेनंतर त्याचा मृतदेह आढळून आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
काशिद समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या सोमनाथ राजेश भोसले (वय २४, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे; सध्या शिर्डी, जि. अहिल्यानगर) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान तो आपल्या कंपनीतील मित्रांसोबत समुद्रात पोहण्यासाठी उतरला होता. काही वेळातच तो पाण्यात दिसेनासा झाला. मित्रांनी तात्काळ शोध घेतला मात्र तो आढळून न आल्याने मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, काशिद समुद्रकिनारी कार्यरत जीव रक्षक व जलक्रीडा व्यावसायिकांच्या मदतीने व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली. समुद्रातील प्रवाह, लाटा व हवामानाचा अंदाज घेत शोधकार्य राबविण्यात आले.
अखेर आज दुपारी साडे तीन ते चारच्या सुमारास काशिद समुद्रात सोमनाथ भोसले याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी काशिदकडे धाव घेतली असून प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.