महाड जिल्हा परिषद निवडणूक आढावा; भाग – 1

Kille raigad
📌📌ऐतिहासिक किल्ले रायगड परिसर आणि औद्योगिक पार्श्वभूमी पण बिरवाडी जिल्हा परिषद गटात विकास कामांची बोंबाबोंब!
महाड | मिलिंद माने 
ऐतिहासिक किल्ले रायगड व औद्योगिक विभागाचा परिसर समाविष्ट असताना देखील तालुक्यातील ५३ बिरवाडी जिल्हा परिषद गट व त्या मध्ये येणाऱ्या धामणे व बिरवाडी या दोन पंचायत समिती गणामध्ये रोजगार व शैक्षणिक व आरोग्याच्या नावाने बोंबाबोंब असल्याचे चित्र मागील पंधरा वर्षापासून कायम असल्याचे पाहण्यास मिळत असून ते बदलण्याची गरज असल्याची भावना या जिल्हा परिषद गटामधील व पंचायत समिती गणामधील सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
महाड तालुक्यातील ५३ बिरवाडी जिल्हा परिषद गटात सवाने, वाळण बुद्रुक, रायगडवाडी, वाकी बुद्रुक, वाळण खुर्द, पाचाड, आमशेत, मांघरून, पंदेरी, रानवडी खुर्द, सांदोशी, सावरट, दहिवड, पाने, वाघोली, वारंगी , दापोली, बावले, धामणे, बिरवाडी आसनपोई, कुसगाव, शेल, साकडी, इत्यादी २६ ग्रामपंचायती समाविष्ट आहेत. बिरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये धामणे , बिरवाडी हे दोन पंचायत समितीचे गण येतात यामध्ये राजकीय दृष्ट्या पंचायत समिती गणामध्ये २० ग्रामपंचायती तर बिरवाडी पंचायत समिती गणामध्ये ६ ग्रामपंचायती समाविष्ट असून एकूण बूथ ३९ आहेत यामध्ये धामणे पंचायत समिती गणामध्ये भारतीय जनता पक्षाकडे १ ग्रामपंचायत तर शिवसेना शिंदे गटाकडे १७ ग्रामपंचायती व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे २ ग्रामपंचायतींवर वर्चस्व आहे. तर बिरवाडी पंचायत समिती गणामध्ये समाविष्ट असणाऱ्या ६ ग्रामपंचायती या शिवसेना शिंदे गटाकडे आहेत.
महाड तालुक्यातील ५३ बिरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये धामणे व बिरवाडी हे दोन पंचायत समिती गण असून यामध्ये औद्योगिक वसाहतीचा परिसर ते वाळन कोंडी व सह्याद्रीच्या पर्वतरांगा यामध्ये वसलेला ऐतिहासिक रायगड किल्ला या परिसरात असणारी गावे ही ग्रामीण भागातील व दर्या खोऱ्यात वसलेली असून या ठिकाणी ऐतिहासिक रायगड किल्ला व वाळन कोंडी असा ऐतिहासिक परिसर असून या ठिकाणी पर्यटकांचा मोठ्या प्रमाणावर वावर दररोज असतो मात्र पाणीटंचाई रोजगार आरोग्यवस्था व दळणवळणाच्या व शिक्षण व्यवस्थेचा मात्र या मतदारसंघात बोजवार उडालेला आहे.
शहरापासून जवळ गावे असली तरी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे रोजगाराच्या संधी स्थानिक तरुणांना नसल्याने आजही रोजगारासाठी येथील तरुण मुंबई ,ठाणे ,पुणे यासारख्या शहरात जात आहेत. शहरापासून या जिल्हा परिषद मतदार संघातील गावे दुर्गम व डोंगराळ भागात वसलेली असल्याने प्रामुख्याने बिरवाडी व पाचाड ही दोनच प्राथमिक आरोग्य केंद्र असून वैद्यकीय उपचारासाठी महाडमध्ये यावे लागते. पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रा मधील समाविष्ट गावांमध्ये आजही महाड शहराजवळ असलेले मांडले परिसरातील गावे आहेत. या गावातील लोकांना जवळपास ३० किलोमीटरहून अधिक किमी चा प्रवास करून पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ घ्यावा लागत आहे. अधिक व शैक्षणिक सुविधांसाठी येथील नागरिकांना व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाड व बिरवाडी परिसरातीलच असणाऱ्या शाळा व महाविद्यालयातील संस्थेवर अवलंबून राहावे लागत आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यात पंधरा वर्षात एकाही राजकीय नेत्याला या ठिकाणी आलेले अपयश आहे. करोडो रुपयांची विकास कामे केल्याचे आभास या मतदारसंघात केला जात असला तरी हे केवळ दिवा स्वप्नच राहिले आहे. शिक्षण आरोग्य याचप्रमाणे दूरध्वनी व्यवस्था देखील या ग्रामीण भागात पूर्णपणे कोलमडलेली आहे. केंद्र सरकारची बीएसएनएल ही दूरध्वनी सेवा तर ग्रामीण भागात आता बंदच पडल्यात जमा आहे. यामुळे महागड्या असणाऱ्या खाजगी कंपन्यांवर व त्यांच्या नेटवर्क वरच ग्रामीण भागातील लोकांना अवलंबून राहावे लागत आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर होणारी पर्जन्यवृष्टी मात्र जानेवारी महिना संपताच पाण्यासाठी दाही दिशा अशी वेळ या मतदारसंघातील जनतेवर येते.
जलजीवन योजनेच्या भ्रष्टाचारामुळे व योग्य नियोजनाच्या अभावामुळे व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जलजीवन योजनेचा बोज वारा उडाल्याने पुन्हा या ग्रामीण भागातील व सह्याद्रीच्या पर्वतरांगात राहणाऱ्या महिलांच्या डोक्यावर पाण्याचा हंडा, ऐन उन्हाळ्यात टँकर व पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ मात्र न चुकता चालू वर्षी देखील पाहण्यास मिळणार आहे, परिणामी विकासाच्या नावाने कितीतरी सत्ताधाऱ्यांनी वल्गना केल्या असल्या तरी परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचे चित्र या मतदारसंघात पाहण्यास मिळत आहे. जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सातत्याने निवडून आलेल्या किंवा उमेदवारी लढवणाऱ्या लोकांपुढे हेच प्रश्न याच समस्या सोडवण्याची पोकळ आश्वासने देण्याची वेळ येते. आजही या परिस्थितीमध्ये बदल न झाल्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आपण कशासाठी निवडून देतो आज प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडला आहे.                               …उर्वरीत पुढील भागात 
            
                                                   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *