मुंबई गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी या भुयारी मार्गातील विद्युत पुरवठा बंद सुरू होण्याचे सातत्य कायम राहिले आहे. परिणामी, हा भुयारी मार्ग भुयारातील लाइट्स आणि व्हेंटिलेशन बंद होऊन अनेकवेळा प्रवासादरम्यान भुयारी मार्गात ‘काळोख आणि कोंदटपणा’ अनुभवण्यास मिळत आल्याने महामार्ग बांधकाम विभाग प्रशासनासह पोटठेकेदार कंपनी ‘एसडीपीएल’ कडून एखादा अपघात होण्याची प्रतिक्षा केली जात आहे का असा संतप्त सवाल प्रवासी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.
कशेडी घाटातील तीव्र वळणाच्या धोकादायक प्रवासापासून वाहने आणि प्रवासी यांना दिलासा मिळावा आणि प्रवासाचा वेळ कमी होऊन मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे या हेतूने कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील वाहतूक सुरू करण्यात आली. एकमेकांना समांतर असलेल्या दोन भुयारी मार्गामधील प्रकाशव्यवस्थेसह व्हेंटिलेशनसह विविध सुरक्षा यंत्रणा बंद असल्याचे भुयारी मार्गातील प्रवासादरम्यान निदर्शनास येत आहे. विशेषतः खेड दिशेकडील दुसऱ्या समांतर भुयारामध्ये प्रवेशद्वारापासून मध्यभाग व त्यापुढील आतील बाजूचे प्रकाशझोत असल्याचे दिसून आले. त्यामुळे भुयारी मार्गाचा आतील भाग केवळ वाहनांच्या हेडलाईटस् च्या प्रकाशामुळे छताकडील कातळातून संततधार कोसळलेल्या ओल्या रस्त्यावर प्रकाशमान झाला होता.
कशेडीचे हे दोन्ही भुयारी मार्ग साधारणपणे दोन किलोमीटर लांबीचे असून त्यामध्ये प्रकाशव्यवस्था तसेच प्रभावी वायुवीजन व्यवस्था सुरू राहण्यासाठी महावितरणचा विद्युत पुरवठा सुरू होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पोटठेकेदार कंपनी ‘एसडीपीएल’चे अमोल शिवतारे यांना तातडीची विद्युत पुरवठा योजना सुरू करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार सुरू झालेल्या खासगी इमर्जन्सी पॉवर स्टेशनमध्ये वारंवार नादुरुस्ती व फ्लड लाइट्स तसेच व्हेन्टीलेशनसाठी पुरेशा विद्युत पुरवठ्याअभावी या सुविधा बंद होऊन भुयारी मार्गातील ‘काळोख आणि कोंदटपणा’ सातत्याने दिसून येत आहे.
भुयारी मार्गात आतील काळोखासारखाच भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वारांच्या परिसरातील तसेच बाहेरील सुमारे अर्धा किलोमीटर महामार्गावरील स्ट्रीट लाईटसदेखील बंद असल्याने भुयारी महामार्गाची अंधार वाट झाली आहे. या परिसरातील काही स्ट्रीट लाईट वगळता जवळपास सर्वच स्ट्रीट लाईट बंद असल्याचे दिसत आहेत. गणेशोत्सव काळानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास दोन, पाच व अकरा दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर होत असल्याने कोकणाकडे जाण्यासाठी होणाऱ्या गर्दी पेक्षा कमी असला तरी भुयारी मार्गात असलेला काळोख आणि कोंदटपणा घातक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.