कर्जत पोलिसांची धडाकेबाज कारवाई! रिसॉर्ट मालकांना धमकावणारे दोन तोतया पोलिस अधिकारी जेरबंद

Karjat Police Station

रायगड | अमुलकुमार जैन
कर्जत तालुक्यात रिसॉर्ट मालकांना धमकावून पैसे उकळणाऱ्या दोन बनावट पोलिसांचा अखेर पर्दाफाश करण्यात आला आहे. शुभम राऊत आणि समीर दुधासे अशी आरोपींची नावे असून, शुभम स्वतःला “एसपी” तर समीर “पोलीस निरीक्षक” असल्याचे भासवत रिसॉर्ट मालकांना फोनवर धमकावत होते. “तुमच्या फार्मवर अल्पवयीन जोडपे आले होते, त्याचा व्हिडिओ काढला आहे, त्यामुळे पोस्को गुन्हा दाखल होईल,” अशी भीती दाखवून ते सेटलमेंटच्या नावाखाली पैसे मागत होते.
२१ ऑक्टोबर रोजी त्यांनी धनंजय म्हसे यांच्याकडून १२ हजार, चेतन घुमरे यांच्याकडून १५ हजार आणि समीर कुडूसकर यांच्याकडून ५ हजार रुपये उकळले. ही सर्व रक्कम ‘आराध्या दुधासे’ या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आली होती. हा प्रकार उघड झाल्यानंतर भूमिपुत्र फार्म संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील, बिपीन लाड आणि अनिल भोसले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिसांनी जलद कारवाई करत दोघांना अटक केली आणि उकळलेले पैसे परत करण्यास भाग पाडले. या तत्पर कारवाईबद्दल रिसॉर्ट मालक आणि स्थानिक नागरिकांनी कर्जत पोलिसांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *