महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. NCMC कार्डधारकांना आता BHIM Appच्या माध्यमातून कार्डचे Top-up करता येणार आहे. त्यामुळे कार्डमधील शिल्लक रक्कम संपल्यानंतर रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नसून, मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या कार्डमध्ये रक्कम जमा करता येणार आहे.
NCMC कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांच्या कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू असून, दि. १५ सप्टेंबर २०२६ पासून BHIM Appद्वारे Top-up सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्डच्या पाठीमागील QR कोड BHIM Appच्या माध्यमातून स्कॅन करावा लागणार आहे. त्यानंतर उपलब्ध प्रक्रियेनुसार आवश्यक रक्कम Top-up करता येईल. त्यामुळे प्रवाशांना आपल्या गरजेनुसार कार्डमध्ये रक्कम सहज आणि तत्काळ जमा करता येणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी ही सुविधा अधिक सोयीची ठरणार असून, NCMC कार्डचा वापर करताना येणाऱ्या रिचार्जच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
एसटी महामंडळाचे NCMC (National Common Mobility Card) हे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस स्मार्ट कार्ड असून, प्रवाशांना अधिक सुलभ डिजिटल प्रवासाची सुविधा देण्यासाठी ते सुरू करण्यात आले आहे. नवीन NCMC कार्डसाठी १९९ रुपये शुल्क, तर जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपये शुल्क आकारले जाते. कार्डमध्ये किमान १०० रुपये बॅलन्स असणे अनिवार्य आहे.
BHIM Appद्वारे Top-upची सुविधा सुरू झाल्यामुळे एसटीच्या डिजिटल प्रवासी सेवांना आणखी बळ मिळाले असून, ‘प्रवाशांच्या सेवेसाठी डिजिटल सुविधा, अधिक सुलभ आणि गतिमान प्रवास’ या उद्देशाला चालना मिळणार आहे.