कोलाड ( श्याम लोखंडे ) : ठाकरे गटाचे शिवसेनाप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या १ आणि २ फेब्रुवारीच्या रायगड दौऱ्यात रोहा येथे गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी पहिलीच सभा होत असल्याने येथील शिवसैनिक यांच्यात मोठे उत्साहाचे वातावरण असल्याने ही सभा ऐतिहासिक जाहीर सभा होत आहे. त्यामुळे रायगडसह राज्यातील राजकीय घडामोडी, आरोप प्रत्यारोप यांसह आगामी लोकसभा तसेच विविध निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची सभा होत असल्याने रोहा शहर, तालुक्यातील शिवसैनिकांत प्रचंड उत्साह संचारला असून ते काय बोलणार याकडे संपुर्ण रायगड करांचे लक्ष वेधले आहे.
गुरूवारी १ फेब्रुवारी रोजी शिवसेना ठाकरे गट पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी रोहा तालुक्यातील शिव सैनिकांनी अजित पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या रोहा होम ग्राउंडवर तसेच त्यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे पहिलीच सभा घेत आहेत. आतापर्यंत रायगडच्या राजकारणातील दमदार आणि धूर्त राजकारणी सुनिल तटकरेंच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी कधीही ठाकरे बाणा दाखविलेला नाही त्यामुळे आजच्या सभेत दस्तुरखुद्द उध्दव ठाकरे काय भूमिका घेत शिव सैनिकांनी सभेतून मंत्रमुग्ध करणार याकडे लक्ष आहे ,तसेच नागरिक व शिवसैनिकांत कायम तटकरेंविरोधात मवाळ भूमिका दाखवून देत असतात. त्यातच मागील माणगाव येथील सभेनंतर युवाप्रमुख आ आदित्य ठाकरे हे सुनिल तटकरे यांच्या सुतारवाडी निवासस्थानी पाहुणाचाराला गेले होते तद्नंतर सत्ता पाळट अशा सर्वच घटनेनंतर आता पुन्हा नवे विरोधक सुनिल तटकरेंवर उद्धव ठाकरे कठोर भाष्य करतात का, तटकरेंचा त्याच बरोबर त्यांना धोका देत सत्तेसाठी पलटवार करणारे शिवसेना फोडणारे आशा नेते गणांचा समाचार घेतात का ? याकडे संबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या धर्तीवर रोहा तालुक्यासह रायगड शिवसैनिकांत दमदार उत्साह संचारला आहे. खा. सुनिल तटकरेंच्या नेतृत्वाखाली शहर व तालुक्याच्या विविध विकासकामांतील भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा एकदा आवाज उठविण्यासाठी सज्ज झालो आहोत, नगरपालिका शहर कामांतील भ्रष्टाचार आधीही समोर आणला, आताही तोच भ्रष्टाचार जनतेसमोर आणणार असा ईशारा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी या कार्यक्रमा दरम्यान शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला, तर आयोजित शिवसेनेच्या सभेला ठाकरे गटाची तोफ आ. भास्कर जाधव उपस्थित राहतात का, तटकरेंचे कायमचे वैरी माजी केंद्रीय मंत्री खा अनंत गीते काय पलटवार करतात ? याचीच सर्वांना उत्सूकता लागली आहे.
रोहा येथील उरुस मैदानावर गुरुवार १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होत आहे. रोहा शहरात उद्धव ठाकरे यांची पहिलीच सभा होत आहे. सभेला जवळपास १० हजार हून अधिक शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांसह अन्य दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती आहे. राज्यातील बदलते राजकीय घडामोडी, शिवसेनेतील फुटीरता, राष्ट्रवादीतील भ्रष्टाचाऱ्यांचा भाजपाशी युती, सुनिल तटकरेंचे कारनामे, आगामी निवडणुकांवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भाष्य करणार तसेच समोर येणाऱ्या निवडणुकीसाठी काय रणनीती आखनार याकडे लक्ष वेधले आहे.
खा सुनिल तटकरेंविरोधात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रोह्यात कधीच सहभाग घेतला नाही, तटकरेंशी अप्रत्यक्ष जुळवून घेतले. आघाडी काळात तटकरेंशी राजकीय सूत जुळवून घेतले. तेच तटकरे आता भाजपा प्रणित अजित पवार गट युतीत असल्याने उद्धव ठाकरे आतातरी खा तटकरेंवर कडाडून टीका करतात का, तसेच माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते तसे माहितीपर कानमंत्र देतात का ? यावर सभेतच उद्धव ठाकरे बाणा चालवितील का ? चालू राजकारणावर कठोर भाष्य करतील का ? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गुरुवारच्या सभेत शिवसैनिकांत प्रचंड उत्साह संचारला आहे. ठाकरे शिवसेनेवर आजही लोकांचा प्रेम आहे, पाठबळ आहे असे स्थानिक पातळीवर देखील सर्व सामान्य माणसाच्या तोंडातून एकव ऐकायला मिळत आहे.
तटकरेंचे राजकीय हाडवैर माजी मंत्री अनंत गीते आगामी निवडणुकांच्या धर्तीवर रोहा येथील पहिल्याच सभेत काय राजकीय भाष्य करतात ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची रोहा येथे पहिली सभा राजकीय दृष्ट्या कितपत यशस्वी ठरते, दुफळी झालेल्या ठाकरे शिवसैनिकांत नवे चैतन्य भरला जातो का ? हे पाहावे लागणार आहे तर आक्रमक नेते आ भास्कर जाधव उपस्थित राहतात का, माजी मंत्री अनंत गीते तटकरेंवर काय दांडपट्टा चालवितात ? हे आजच्या सभेत दिसून येईल का याकडे लक्ष वेधले आहे.