
उरण | विठ्ठल ममताबादे
उरण येथील जेएनपीए मराठी व इंग्रजी माध्यम विद्यालयाचा २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून कारभार डोंबिवली येथील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य साई संस्था (ट्रस्ट) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिक्षकांच्या हिताचे निर्णय लक्षात घेऊन जेएनपीए प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे परिसरातील पालकांनी स्वागत केले असून, जेएनपीए प्रशासन तसेच साई संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या डोंबिवली येथील साई संस्था (ट्रस्ट) यांच्याकडे उरण येथील जेएनपीए मराठी व इंग्रजी माध्यम विद्यालयाचा कारभार २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून अधिकृतपणे सोपविण्यात आला आहे. या निर्णयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. साई संस्था गेली १८ वर्षांहून अधिक काळ डोंबिवली येथे मराठी, गुजराती व इंग्रजी माध्यमाच्या शाळा यशस्वीपणे चालवत असून, रायगड जिल्ह्यातील माणगाव येथेही गेली २४ वर्षांपासून इंग्रजी माध्यमाची शाळा कार्यरत आहे. या सर्व शाळांनी दहावीच्या परीक्षेत सातत्याने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
मागील चार वर्षांत संस्थेने उरण येथे नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे ई.बी. गडकरी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय तसेच नरसू पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सुरू करून शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय विस्तार केला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि प्रकल्पग्रस्त कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने देशातील अग्रगण्य बंदर प्राधिकरणांपैकी एक असलेल्या जेएनपीए प्रशासनाने जेएनपीए विद्यालयाची जबाबदारी साई संस्थेकडे सोपविली आहे. यामुळे मराठीबरोबरच इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
याबाबत साई संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांनी सांगितले की, मी स्वतः शिक्षक असल्यामुळे शिक्षण क्षेत्राची मला चांगली जाण आहे. जेएनपीए प्रशासनाने आमच्या संस्थेवर दाखविलेला विश्वास आम्ही निश्चितपणे सार्थ ठरवू. संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहतील. ते पुढे म्हणाले, बहुसंख्य विद्यार्थी हे प्रकल्पग्रस्त कुटुंबातील असल्याने त्यांना पीएपीच्या सवलती मिळतील. चालू शैक्षणिक वर्षात कोणत्याही प्रकारची फी वाढ केली जाणार नाही. तसेच शासनाचे अनुदान मिळविण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने परवानगी दिली असल्यामुळे शिक्षकांच्या वेतनातही सुधारणा होईल आणि त्यांची नोकरी अधिक सुरक्षित होईल. शासनाच्या निकषांनुसार विद्यार्थ्यांनाही विविध मोफत शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळेल.
आपली व्यक्ती, आपली शाळा” हे ब्रीदवाक्य घेऊन साई संस्था जेएनपीए विद्यालयाचा कारभार सांभाळणार असल्याने पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास नरसू पाटील यांनी व्यक्त केला.
Related