रायगड जिल्ह्यातील आवास येथे वाहन पार्किंग करण्याच्या वादातून दोन गटात वाद झाला असून यामध्ये धर्मेंद्र. नंदकुमार राणे(वय ३६ वर्षे रा आवास राणे आळी, अलिबाग) यांचा मृत्यू झाला आहे तर विवेक नंदकुमार राणे, विश्वास नदकुमार राणे वय ३२वर्षे, करुणा नंदकुमार राणे (सर्व राहणार आवास तालुका अलिबाग, जिल्हा रायगड) हे तिघेजण जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद विवेक नंदकुमार राणे(वय 34 वर्षे) यांनी देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे,अंकित अशोक राणे,शुभम संतोष पाटील,वैभव लक्ष्मण म्हात्रे,पुनम देवेंद्र म्हात्रे,सिया देवेंद्र म्हात्रे (रा आवास तालुका अलिबाग, जिल्हा रायगड) यांच्याविरोधात मांडवा सागरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील आवास येथे फिर्यादी विवेक राणे व जखमी हे त्यांचेकडे असणाऱ्या फोर व्हीलर गाडी मध्ये पावसाचे पाणी जात असल्याने त्यांच्या घरासमोरील शेडमध्ये लावीत असताना जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून गुरुवारी (दिनांक २२मे २०२५रोजी) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी यांनी जुन्या भांडणाच्या रागातून चाकू, सुरा, तलवारीसह राणे कुटुंबावर सशस्त्र हल्ला करीत शिवीगाळ केली.
यावेळी वैभव म्हात्रे व अंकित राणे यांनी विवेक राणे यांचे भाऊ धर्मेंद्र राणे याला पकडून ठेवले. त्यानंतर देवेंद्र म्हात्रे याने धर्मेंद्र राणे यांच्या छातीमध्ये चाकू भोसकून त्यांना गंभीर जखमी केले. शुभम पाटीलने विश्वासला पकडून आरोपीत अंकित राणे याने ठारच मारतो, असे बोलून त्याचे छातीत सुद्धा चाकू भोसकला. फिर्यादी यांना वैभव म्हात्रे यांनी पकडून आरोपीत सिया म्हात्रे यांनी फिर्यादी यांचे पाठीमागे कमरेवर सुरा मारला. त्यावेळी त्यांची आई तिला पकडण्याकरता आली असता, आरोपी पूनम म्हात्रे यांनी फिर्यादी यांचे आईच्या मानेवर सुरा मारून दुखापत केली. यामध्ये धर्मेंद्र नंदुकूमार राणे गंभीर जखमी होऊन मृत पावले आहेत. तसेच विवेक राणे, विश्वास राणे, करुणा राणे हे तिघेजण जखमी झाले असून या तिघांवर अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मांडवा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम 2023 चे१०३,१०९,१२६(२) ११८(१),३५२,३५१(२), १९०,१९१, (२,३) व इतर भारतीय शस्त्र अधिनियम ४,२७तसेच मपोका ३७(३) अन्वये दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी आरोपींना अटक करीत त्यांना अलिबाग येथील सत्र न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती मांडवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांनी दिली आहे .