शिवराज्याभिषेक सोहळा: तारीख की तिथी? संभाजी भिडे यांच्या विधानानंतर वाद पुन्हा पेटला! फत्तेसिंह सावंत यांचं ठणकावून उत्तर – “६ जूनच सर्वोच्च!”

Shivaji Maharaj

महाड (मिलिंद माने) : 
३५२ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून २०२५ रोजी तारखेनुसार मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मात्र, सध्या या सोहळ्याच्या तारीख आणि तिथीवरून पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. याला कारण ठरलं आहे संभाजी भिडे यांचं वादग्रस्त विधान, ज्यात त्यांनी “६ जून ही तारीख नामशेष करा” असं म्हणत शिवराज्याभिषेक सोहळा राजकारणासाठी वापरला जातो, असा आरोप केला.
या वक्तव्यानंतर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी जोरदार प्रतिवाद केला आहे. त्यांनी ठणकावून सांगितलं की,

“एकच धुन ६ जून ६ जून! आमच्यासाठी हा दिवस गौरवाचा, अभिमानाचा आहे. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत ६ जूनलाच शिवराज्याभिषेक साजरा केला जाईल.”

शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत सुरुवातीपासून दोन भूमिका समोर आल्या. ‘कोकण कडा’ संस्था तिथीनुसार सोहळा साजरा करते, तर युवराज संभाजीराजे यांच्या पुढाकाराने तारखेनुसार म्हणजेच ६ जूनला राजसी सोहळ्याची परंपरा सुरु झाली. त्यांच्या मते, हा सोहळा जगभर पोहोचवायचा असेल, तर तो एकाच दिवशी साजरा झाला पाहिजे.
शासनाने देखील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी निधीची तरतूद करून अधिकृत मान्यता दिली आहे. मात्र, सध्याच्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आहे.
तिथी की तारीख – या चर्चांमधून मतभेद स्पष्ट असले तरी प्रत्यक्षात लाखो शिवभक्त ६ जूनलाच किल्ले रायगडावर एकत्र येत असतात. त्यामुळे ६ जून हीच शिवराज्याभिषेकाची राष्ट्रीय आणि ऐतिहासिक ओळख ठरत आहे, असं मत शिवभक्तांतून उमटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *