सिडकोच्या ‘ग्रीन कॉरिडॉर’ धोरणातून खारघरमध्ये पहिले शहरी शेती केंद्र साकारण्याचा मार्ग मोकळा

Firstagriculture centre
नवी मुंबई | प्रतिनिधी 
सिडकोने उच्चदाब वीजवाहिन्यांच्या खालील जमिनीचा हरित विकासासाठी उपयोग करण्याच्या दूरदृष्टीपूर्ण ‘ग्रीन कॉरिडॉर’ धोरणामुळे नवी मुंबईतील पहिले शहरी शेती केंद्र साकार होण्याचा मार्ग खुला झाला आहे. याच धोरणांतर्गत सिडकोने २००८ साली खारघर येथील सेक्टर-५, उत्सव चौकाजवळ कोकण कृषी विकास प्रतिष्ठान (केकेव्हीपी), मुंबई यांना नर्सरी तसेच कृषी माहिती केंद्रासाठी भूखंड उपलब्ध करून दिला होता. या केंद्रामार्फत केकेव्हीपीने शहरी शेती व नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्य केले आहे.
खारघर येथील या उपक्रमाला मिळालेल्या व्यापक मान्यतेतूनच शहरी शेती, नैसर्गिक शेती आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी केकेव्हीपी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्याअंतर्गत प्रात्यक्षिके, जनजागृती कार्यक्रम, प्रशिक्षण, क्षमता वृद्धी व अभ्यास दौरे यांसारख्या विस्तार उपक्रमांवर भर देण्यात येणार असून शहरी शेती व कृषी उद्योजकतेला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. या उपक्रमाचा लाभ नवी मुंबईसह इतर शहरी व उपनगरातील शेतकरी, शहरी उत्पादक आणि कृषी उद्योजकांना होणार आहे.
या वेळी डॉ. मंदार गीते, कार्यक्रम समन्वयक, केकेव्हीपी यांनी शहरी शेतीमुळे अन्नसुरक्षा, हरित क्षेत्रवाढ, हवामान बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता तसेच शहरी जैवविविधतेत होणारी वाढ यावर प्रकाश टाकला. शेखर सावंत, व्यवस्थापकीय विश्वस्त, केकेव्हीपी यांनी विद्यापीठाशी असलेल्या या सहकार्याद्वारे ज्ञानविनिमय, कौशल्य विकास आणि खारघर, नवी मुंबई येथे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून शहरी शेती केंद्र उभारण्याची गरज अधोरेखित केली. हा सामंजस्य करार डॉ. संजय भावे (कुलगुरू), डॉ. सतीश नारखेडे (शिक्षण संचालक), डॉ. संतोष वरवडेकर यांच्यासह विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापकांच्या उपस्थितीत दापोली येथे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *