महाड एमआयडीसी रोडवरील अपूर्ण व संथगतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक दुर्दैवी घटना घडली आहे. दिनांक १ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास महाड एमआयडीसी कार्यालयासमोर भरधाव मिनीडोर रिक्षाने पादचाऱ्याला उडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांगलवाडी दिशेकडून बिरवाडीच्या दिशेने जाणारी एम.एच. ०६ एस ३३२६ क्रमांकाची मिनीडोर रिक्षा भरधाव वेगात होती. एमआयडीसी कार्यालयासमोरील रस्त्यावरून पायी जात असताना या रिक्षाने दिलीप महादेव तलाठी (रा. प्रभात कॉलनी, महाड) यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला तसेच दोन्ही हात व पायांना गंभीर दुखापती झाल्या. नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मिनीडोर चालक अब्दुल हमीद मोहम्मद वंड्रे (वय ४७, रा. दाभोल मोहल्ला, ता. महाड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एमआयडीसी रोडवरील खड्डे, अपुरी प्रकाश व्यवस्था व सूचना फलकांचा अभाव यामुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले असून, प्रशासनाने तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करावे व सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.