विश्वासाची ८ हजार कोटींची भरारी; रायगड जिल्हा बँकेचा सहकार क्षेत्रात नवा विक्रम

अलिबाग | अमुलकुमार जैन
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ८,००० कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा गाठत सहकार क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या चार वर्षांत बँकेच्या व्यवसायात दुपटीहून अधिक वाढ झाली असून, ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि आधुनिक बँकिंग सेवांच्या बळावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे.
गेल्या ६५ वर्षांपासून शेतकरी, सभासद, महिला बचत गट, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपत बँकेने सातत्याने प्रगतीची वाटचाल केली आहे. डिजिटल बँकिंग, कोअर बँकिंग प्रणाली, रुपे केसीसी कार्ड, स्वयं-सहाय्यता गटांचे सक्षमीकरण आणि ग्राहकाभिमुख सेवा यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांनाही अत्याधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार जयंत पाटील यांनी या यशाबद्दल राज्यातील सहकारी संस्था, पतसंस्था, बँका तसेच शासकीय व निमशासकीय आस्थापनांचे आभार मानले. ८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय हा केवळ आर्थिक आकडा नसून, ग्राहक, सभासद आणि शेतकऱ्यांनी बँकेवर दाखविलेल्या अढळ विश्वासाचा गौरव आहे, असे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी या यशाचे श्रेय संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघभावनेला दिले. आर्थिक शिस्त, नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि ग्राहककेंद्री सेवा यामुळे ही भरारी शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मार्च २०२८ पर्यंत बँकेचा व्यवसाय १० हजार कोटी रुपये आणि स्वनिधी १,००० कोटी रुपये करण्याचे लक्ष्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहकार, विश्वास आणि आधुनिकतेचा संगम साधत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उभारलेली ही यशस्वी वाटचाल जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीसाठी नवी ऊर्जा देणारी ठरत असून, ८ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय हा सहकार क्षेत्रातील एका नव्या पर्वाची सुरुवात मानला जात आहे.