वारीच्या रिंगणाचा जागतिक गौरव; रायगडच्या छायाचित्रकाराची फोटो ऑलिंपिकमध्ये झेप

अलिबाग  | अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या एका यशस्वी कामगिरीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. यावर्षीच्या जागतिक फोटो ऑलिंपिक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी रायगडमधील छायाचित्रकार सुधीर नाझरे यांच्या छायाचित्राची निवड झाली असून, त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झालेला वारीतील रिंगण सोहळ्यात धावणाऱ्या घोड्याचा देखणा क्षण जागतिक स्तरावरील स्पर्धेच्या अधिकृत पोस्टरवर झळकला आहे.
वारीची परंपरा, संस्कृती आणि भक्तिभाव यांचे जिवंत दर्शन घडविणाऱ्या या छायाचित्राने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. रिंगणातील घोड्याची वेगवान धाव, त्यामागील अध्यात्मिक वातावरण आणि छायाचित्रातील कलात्मकता यामुळे या छायाचित्राला विशेष मान्यता मिळाल्याचे सांगितले जात आहे.
जागतिक फोटो ऑलिंपिकसारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत दुसऱ्या फेरीपर्यंत मजल मारणे ही मोठी उपलब्धी मानली जात असून, आता इटली येथे होणाऱ्या पुढील फेरीसाठी निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे छायाचित्रकारासह रायगडवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील फेरीतही यश मिळवून भारताचे आणि महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांमुळे आणखी मोठे यश मिळेल, अशी भावना छायाचित्रकार सुधीर नाझरे यांनी व्यक्त केली आहे.