श्रीवर्धन तालुक्यातील वडवली येथे कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या यशोदा महिला शेतकरी गट वडवली यांच्या माध्यमातून रविवार दि.२ऑगस्ट रोजी भात शेतीची चार सूत्री नियंत्रित पद्धतीने लागवड उपक्रम राबवण्यात आला.
श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती सचिन किर, गटविकास अधिकारी राजू किरवे आणि तालुका कृषी अधिकारी श्रद्धा डुबरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आधुनिक शेती पद्धतीची माहीती घेतली.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’चे तालुका अभियान व्यवस्थापक स्वप्नील जाधव, प्रभाग समन्वयक तथा मार्गदर्शक किशोर गोरटे, सहायक कृषी अधिकारी पंकज पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी तथा मार्गदर्शक अभिजित गावडे, निमंत्रक मीनाक्षी पेडणेकर आणि विनिता किर उपस्थित होते. यशोदा महिला शेतकरी गटाच्या सरिता कांबळे, दीक्षा कांबळे, शुभांगी पेरवे, विनंती कांबळे, उजिता नाक्ती, विजया भायदे, शुभांगी भायदे, रसिका पेरवे, वृषाली भायदे, प्रियांका कांबळे आणि नमिता बिराडी यांच्यासह उपस्थित सर्वांनी प्रत्यक्ष लागवडीत सहभाग घेतला.
चार सूत्री नियंत्रित लागवड पद्धतीमुळे पाण्याचा काटेकोर वापर, उत्पादन खर्चात बचत, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि उत्पादनवाढ साध्य होण्यास मदत होते. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे नैसर्गिक व शाश्वत शेतीला चालना मिळणार असून, शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.