भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर माणगाव तहसील कार्यालयात सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची व प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक यशस्वीरीत्या पार पडली.
भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार मतदार यादीचे शुद्धीकरण, पुनर्रचना, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण तसेच १२०० पेक्षा अधिक मतदार असलेल्या आणि अत्यल्प मतदार असलेल्या मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीस माणगाव तहसीलदार मा. विपीन लोकरे यांच्या उपस्थितीत तसेच नायब तहसीलदार (वर्ग-२) श्री. अरविंद घेमुड यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे तालुकाध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित राहून मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात आपली मते व सूचना प्रशासनासमोर मांडल्या.
या बैठकीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ. सिंग, विलास सुर्वे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे प्रभाकर ढेपे, नगरसेवक अजित तार्लेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिमण सुखदरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, मतदार गणना अर्ज (Enumeration Forms) संकलन, त्यांचे डिजिटायझेशन, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व अद्ययावत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत प्रशासनाने सविस्तर मार्गदर्शन केले.
विशेष म्हणजे, SIR प्रक्रियेअंतर्गत आयोजित करण्यात आलेली ही ऑनलाइन बैठक अत्यंत यशस्वी ठरली. प्रशासन व सर्वपक्षीय प्रतिनिधी यांच्यात सकारात्मक समन्वय साधला गेला असून मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
बैठकीच्या शेवटी तहसीलदार श्री. विपीन लोकरे यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या सूचना विचारात घेऊन निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. अशा समन्वय बैठकीमुळे मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक व विश्वासार्ह होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.