
पोलादपूर | शैलेश पालकर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पोलादपूरजवळील कशेडी घाटात भरधाव वेगातील यामाहा आर-15 दुचाकी रस्त्यालगतच्या रेलिंगवर आदळून झालेल्या भीषण अपघातात 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महाड तालुक्यातील वाळण-झोळीचा कोंड येथील रहिवासी राज विनोद मोरे (वय 23) हा मंगळवारी रात्री त्याच्या ताब्यातील यामाहा आर-15 (एमएच 06 सीएस 2594) या दुचाकीवरून महाडहून खेडच्या दिशेने जात होता. कशेडी घाटातील चोळई गाव हद्दीत सायली हॉटेलसमोरील तीव्र वळणावर भरधाव वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्यालगतच्या लोखंडी रेलिंगवर जोरात आदळली. या भीषण अपघातात राज मोरे गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्याला तातडीने ॲम्ब्युलन्सद्वारे ग्रामीण रुग्णालय, महाड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली असून, पोलादपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलादपूर पोलीस करत आहेत.
Related