रायगड जिल्ह्यातील कर्जत-खोपोली मार्गावर पळसदरी डॅमजवळ गुरुवारी (६ ऑगस्ट) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर अपूर्ण रस्ते, अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना आणि रखडलेल्या कामावर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला जबाबदार धरले आहे.
कर्जत-खोपोली मार्गावरील पळसदरी येथील अरुंद रस्त्यावर समोरासमोर झालेल्या दुचाकी आणि वॅगनर कारच्या भीषण धडकेत अंबरनाथ येथील सोनाली हिचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक रोहित वाघमारे (रा. पोशीर) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ताकई येथील मित्रांचा गट माथेरानच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, पळसदरी यांच्या रुग्णवाहिकेने चालक दत्तात्रय दरेकर यांच्या तत्परतेमुळे जखमीला उपजिल्हा रुग्णालय, कर्जत येथे दाखल करण्यात आले.
या अपघातानंतर कर्जत-खोपोली मार्गावरील अपूर्ण रस्त्याच्या कामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी रस्त्याची रुंदी अचानक कमी होते, तर इशारा फलक, सुरक्षा बॅरिकेड्स, परावर्तक चिन्हे आणि इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त करत तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या मार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला अनेक शेतकऱ्यांना गेल्या दहा वर्षांपासून मिळालेला नसल्याने रस्त्याचे काम रखडल्याचे सांगितले जात आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असली तरी मोबदल्याअभावी काम पूर्णत्वास गेलेले नाही. “पळसदरीचा अर्धवट रस्ता आणखी किती जणांचा बळी घेणार?” असा संतप्त सवाल उपस्थित करत प्रशासनाने शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देऊन रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.