महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी मंजुरी दिल्याने या विधेयकाचे आता अधिकृतपणे कायद्यात रूपांतर झाले आहे. बळजबरी, फसवणूक, आमिष, दिशाभूल किंवा लग्नाचे खोटे आश्वासन देऊन होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी हा कायदा करण्यात आला असून, आता राज्य सरकारच्या अधिसूचनेनंतर तो राज्यभर लागू होणार आहे.
राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी हा कायदा अधिसूचना जारी करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे आता हा कायदा नेमक्या कोणत्या तारखेपासून लागू होणार, याकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. मार्च २०२६ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र विधानसभेत हे विधेयक मंजूर झाले होते. त्यानंतर विधान परिषदेतही त्याला संमती मिळाली आणि पुढील घटनात्मक प्रक्रियेनंतर राष्ट्रपतींची अंतिम मंजुरी प्राप्त झाली.
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ अंतर्गत बळजबरी, धमकी, फसवणूक, दिशाभूल, आमिष किंवा लग्नाचे खोटे वचन देऊन करण्यात येणारे धर्मांतर दखलपात्र गुन्हा मानण्यात आला आहे. स्वेच्छेने धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला ६० दिवस आधी सक्षम प्राधिकरणाकडे अर्ज करणे बंधनकारक असेल. धर्मांतर स्वेच्छेने झाले असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेवर असेल. तसेच आई-वडील, भाऊ-बहिण किंवा इतर जवळचे नातेवाईक तक्रार दाखल करू शकतील.
कायद्याचे उल्लंघन झाल्यास सात वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद करण्यात आली असून, पुनरावृत्ती झाल्यास शिक्षा दहा वर्षांपर्यंत वाढू शकते. आंतरधर्मीय विवाहासंदर्भात अपत्याला आईचा विवाहपूर्व धर्म लागू होईल, अशीही महत्त्वाची तरतूद या कायद्यात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीकडे आणि त्याच्या परिणामांकडे राज्यभरातून लक्ष लागले आहे.