रक्तसाठ्याच्या अद्ययावत माहितीचा मुद्दा विधिमंडळात : आ. महेश बालदी आणि आ. प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष

आ. प्रशांत ठाकूर आणि आ. महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष
उरण | विठ्ठल ममताबादे 
महाराष्ट्रातील रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी सर्व रक्तपेढ्यांनी आपल्या रक्तसाठ्याची अद्ययावत माहिती दररोज संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असतानाही काही रक्तपेढ्यांकडून ही माहिती वेळेवर अद्ययावत केली जात नसल्याचा मुद्दा आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधानमंडळात तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. या प्रश्नाच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील रक्तपुरवठा व्यवस्थेतील त्रुटींकडे शासनाचे लक्ष वेधले.
मालेगाव शहरातील मालेगाव रक्तपेढी, सेवा रक्तपेढी, अन्सार रक्तपेढी, सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी तसेच मुंबईतील शासकीय रक्तपेढी आणि सर जे. जे., सेंट जॉर्ज, केईएम, सायन, नायर व राजावाडी रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा अपुरा पडत असल्याने थॅलेसेमिया रुग्ण, मोठ्या शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन उपचारांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यामुळे अनेक रुग्णांना स्वखर्चाने खासगी रक्तपेढ्यांकडे जावे लागत असल्याची बाबही त्यांनी मांडली.
या प्रश्नाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी लेखी उत्तर देताना राज्यातील काही रक्तकेंद्रांकडून रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत केली जात नसल्याचे अंशतः मान्य केले. मात्र, या कारणामुळे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक रक्त मिळण्यात अडचणी आल्याची कोणतीही तक्रार राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे प्राप्त झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री आबिटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मे २०२६ या कालावधीत मुंबई आणि नाशिक जिल्ह्यातील संबंधित रक्तकेंद्रांमध्ये एकूण २५ हजार ३३४ युनिट रक्तसाठा उपलब्ध होता. त्यापैकी २४ हजार ४४६ युनिट रक्ताचा वापर करण्यात आला असून आवश्यकतेनुसार रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात आला आहे.
थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनाच्या १२ फेब्रुवारी २०१४ च्या निर्देशांनुसार तसेच राज्य शासनाच्या १८ जून २०१४ च्या परिपत्रकानुसार सर्व शासकीय व अशासकीय रक्तकेंद्रांना मोफत रक्त देणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच ई-रक्तकोष आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर रक्तसाठ्याची माहिती नियमित अद्ययावत करण्यासाठी सर्व रक्तकेंद्रांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे सांगितले.
रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर शासन निर्णयानुसार प्रतिदिन एक हजार रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद असून, सन २०२५-२६ या कालावधीत संबंधित रक्तकेंद्रांवर एकूण ३२ लाख ६७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहितीही मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपल्या लेखी उत्तरात दिली.