पहिल्याच पावसात कशेळे बाजारपेठ जलमय; तुंबलेल्या गटाऱ्यांमुळे दुकानदारांचा संताप

कर्जत-ग्रामीण | मोतिराम पादिर
पहिल्याच पावसात कर्जत तालुक्यातील कशेळे बाजारपेठेतील गटारे तुडुंब भरून वाहू लागल्याने संपूर्ण बाजारपेठेत पाणी आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. गटारे तुंबल्यामुळे दोरेवाडी रस्त्यावरील पावसाचे पाणी थेट बाजारपेठेतून वाहत कशेळे–कोठिंबे मार्गालगतच्या दुकानांमध्ये शिरत आहे. त्यामुळे दुकानदारांचे आर्थिक नुकसान होत असून ग्राहकही दुकाने गाठणे टाळत असल्याचे चित्र आहे. स्थानिकांच्या मते, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कशेळे ग्रामपंचायत यांचे गटारांची स्वच्छता व देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
व्यापारी सामाजिक संस्था कशेळे तसेच स्थानिक दुकानदारांनी गटारांची साफसफाई आणि अतिक्रमण हटविण्याबाबत अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही समस्या गंभीर स्वरूप धारण करते. अनेक ठिकाणी गटारे गाळ, कचरा आणि चिखलाने भरली असून काही भागांत गटारांवर अतिक्रमण झाल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी पाणी रस्त्यावरून वाहत दुकानांमध्ये घुसत असल्याने व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, कशेळे बाजारातील गटारांच्या बांधकामाचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडल्याचा आरोपही दुकानदारांनी केला आहे. अपूर्ण अवस्थेत उघडी गटारे सोडल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. काही दुकानदारांना स्वतःच्या खर्चाने गटारासमोरील काम पूर्ण करण्यास सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित विभागांनी तातडीने गटारांची साफसफाई, अतिक्रमण हटवून अपूर्ण काम पूर्ण करावे आणि या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.