रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या दुपारी ४ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात शनिवार (४ जुलै) रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार सरासरी १०३.८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, चालू हंगामातील एकूण पर्जन्यमान ७८४.० मि.मी. (९६.६ टक्के) इतके झाले आहे.
जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या नदी पाणीपातळी अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत रोहा तालुक्यातील अंबा नदी (नागोठणे बंधारा) ८.९५ मीटर, कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) २३.१० मीटर आणि खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (लोहोप) २०.६० मीटर इतक्या पातळीवर पोहोचून इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, महाड येथील सावित्री नदी, कर्जतमधील उल्हास नदी आणि पनवेलमधील गाढी नदी या अद्याप इशारा पातळीखाली वाहत असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.
धरणांबाबतच्या माहितीनुसार, हेटवणे मध्यम प्रकल्पात सुमारे ३३ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील २८ लघु प्रकल्पांपैकी ५ लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून पावसाचा जोर कायम असल्याने संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून, प्रमुख रस्ते व रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. कोणतीही जीवितहानी, पशुधनहानी किंवा नागरिकांचे स्थलांतर झाल्याची नोंद नाही.
मात्र, पावसामुळे काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. माणगाव तालुक्यात चार घरांचे अंशतः नुकसान झाले असून, तळा तालुक्यातील चरई खुर्द आदिवासीवाडीत एक झोपडी कोसळली आहे. तसेच ताम्हाणे येथे एका घरावर झाडाची फांदी पडून नुकसान, रोहा तालुक्यातील पिंगळसई येथे एक झोपडी कोसळणे, अलिबाग तालुक्यात एका कच्च्या घराचे अंशतः नुकसान आणि खालापूर तालुक्यात कारगाव येथे गुरांच्या गोठ्यावर झाड पडून नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदी, नाले आणि पूरप्रवण भागांपासून दूर राहण्याचे, तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.