मुसळधार पावसाने पेण शहराला झोडपले; दुकानांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान

PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक दुकानांमध्ये तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे.
पेण एसटी स्टँड समोरील परिसरात पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः दैनिक सामनाचे प्रतिनिधी राजेश प्रधान यांच्या चष्म्याच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे दुकानातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, शहरातील मच्छी मार्केट, चिंचपाडा, विठ्ठल आळी, कुंभार आळी, म्हाडा वसाहत आदी भागांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अचानक आलेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांची व वाहान चालकांची एकच तारांबळ उडाली असून प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.