मध्यरात्रीचा थरार! हत्यारासह चोरीची बस घेऊन फिरणारा आरोपी रंगेहात जेरबंद

रायगड | अमुलकुमार जैन
द्रोणागिरीतील सेक्टर ५० परिसरात गुरुवारी मध्यरात्री थरारक घटना घडली. हत्यार बाळगून चोरीची मिनी बस घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या आरोपीला स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे उरण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रंगेहात जेरबंद केले. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहाच्या सुमारास एक व्यक्ती मिनी बस घेऊन वारंवार परिसरात फेऱ्या मारत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. संशय वाढल्यानंतर काही जागरूक नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्याच्यावर लक्ष ठेवले. काही वेळातच नागरिकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने हातात घातक हत्यार दाखवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी धाडस दाखवत शिताफीने त्याला घेराव घातला आणि तात्काळ उरण पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि नागरिकांच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपीकडून चोरीची मिनी बस ताब्यात घेतली. या बसवर ‘श्री चिरनेर महागणपती’ असे नाव असून बस क्रमांक MH 03 CP 7877 असल्याची माहिती आहे. आरोपीकडे हत्यार आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, नवी मुंबई परिसरात गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी एकूण २६ चोरीची वाहने हस्तगत केली असून, पकडलेला आरोपी मोठ्या वाहनचोरी रॅकेटचा भाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर मिनी बस नेमकी कुठून चोरीला गेली, आरोपीने याआधी आणखी किती वाहने चोरली आहेत आणि या मागे कोणते टोळके कार्यरत आहे, याचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
“नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. वेळेवर मिळालेल्या माहितीतून आम्हाला तातडीची कारवाई करता आली,” अशी प्रतिक्रिया उरण पोलिसांनी दिली. या घटनेत धाडस दाखवणाऱ्या नागरिकांचे पोलिसांकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे.
मध्यरात्री घडलेल्या या थरारक प्रकारामुळे द्रोणागिरी परिसर हादरून गेला असून, नागरिक–पोलीस एकजूट हीच गुन्हेगारीविरोधातील खरी ताकद असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.