नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागोठणे-रोहा मार्गावरील भिसे खिंडीत रविवारी (५ जुलै) सकाळी आमडोशी फाट्याजवळ झाड आणि मातीचा मोठा ढिगारा (दरड) रस्त्यावर कोसळल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. नागोठणे पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने तातडीने मदतकार्य हाती घेत काही तासांत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिसे खिंड परिसरात सकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास मोठे झाड आणि मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळला. त्यामुळे नागोठणे-रोहा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले झाड हटविण्यासह मातीचा ढिगारा साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर काही तासांतच रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला आणि वाहतूक पूर्ववत सुरू झाली. त्यामुळे वाहनचालकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले.
दरम्यान, भिसे खिंड परिसरातील अनेक झाडे धोकादायक अवस्थेत असून सततच्या पावसामुळे ती कधीही कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.