बोरघाट महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

रायगड | अमुलकुमार जैन
बोरघाट महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच वाहनांची एकमेकांवर धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले. या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
आज सकाळी झालेल्या या अपघातानंतर घटनास्थळी आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस स्टेशन, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, मृत्युंजय देवदूत आणि हेल्प फाउंडेशन यांच्या पथकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. लोकमान्य हॉस्पिटलची ॲम्बुलन्सही घटनास्थळी पोहोचून जखमींना त्वरित वैद्यकीय मदत देण्यात आली.
अपघाताची प्राथमिक कारणे तपासण्याचे काम पोलीसांनी सुरू केले असून, वाहनांची धडक आणि अतिवेग हे संभाव्य कारण असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत मृतकांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. काही तास वाहतूक ठप्प झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.