बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाला असून, या निकालाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला मोठा धक्का बसला आहे. पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन लढलेली ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र, शशांक राव यांच्या पॅनलने 12 जागा, प्रसाद लाड यांच्या महायुती पॅनलने 9 जागा जिंकून वर्चस्व मिळवलं तर ठाकरे बंधूंच्या पॅनलला एकही जागा मिळाली नाही.
2016 मध्ये शिवसेना उत्कर्ष पॅनलने तब्बल 16 जागांवर विजय मिळवत वर्चस्व गाजवलं होतं. मात्र, 2025 मध्ये ठाकरे बंधू एकत्र येऊनही पूर्ण पराभव स्वीकारावा लागला. यामुळे ठाकरे ब्रँडचा प्रभाव कामगारांमध्ये कमी झाल्याचं चित्र समोर आलं आहे. महापालिकेत अनेक वर्षं सत्तेत असूनही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, उमेदवारांवरुन निर्माण झालेले मतभेद, प्रचारात वरिष्ठ नेत्यांचा अभाव, तसेच जुन्या संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप या पराभवाची प्रमुख कारणं मानली जात आहेत.
कामगार संघटनांमध्ये शशांक राव पॅनल व महायुती पॅनलचा विजय तर ठाकरे बंधूंच्या युतीचा पराभव हा निकाल बेस्ट कामगारांच्या बदललेल्या मनोवृत्तीचा दाखला मानला जातो. या निकालामुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय समीकरणांवर आणि भविष्यातील युतीच्या राजकारणावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.