पेण तालुक्यात १६ जूनपासून शाळांना सुरुवात; पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके तसेच नवागत बालकांचे औक्षण व फुलांनी स्वागत

पेण तालुक्यात १६ जूनपासून शाळांना सुरुवात; पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके तसेच नवागत बालकांचे औक्षण व फुलांनी स्वागत
पेण : 
मे महिन्याच्या उन्हाळी सुटीनंतर सोमवारपासून पुन्हा शाळांची गजबज सुरू होणार आहे. रायगड जिल्ह्यातील पेण पंचायत समिती अंतर्गत सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा १६ जूनपासून सुरु होत आहेत. लहान बालकांची किलबिल पुन्हा एकदा शाळांमध्ये ऐकायला मिळणार आहे.
पेण पंचायत समिती अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या २१५ प्राथमिक शाळा, नगरपालिका क्षेत्रातील ९ शाळा, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित ३८ शाळा आणि ५ शासकीय आश्रमशाळा अशा एकूण २६७ शाळांमध्ये पहिली ते आठवीचे वर्ग भरतील. या शाळांमध्ये एकूण १५,२६६ विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी नवीन पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी शर्मिला शेंडे यांनी दिली.
विशेषतः इयत्ता पहिलीसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्राप्त झाली आहेत. याचे वितरण विषय साधन व्यक्तीमार्फत केले जात असून पटसंख्या लक्षात घेऊन पुस्तकांचे समायोजन तालुका व जिल्हा स्तरावर करण्यात येते.
इयत्ता पहिलीसाठी शिक्षकांचे प्रशिक्षण ११ ते १३ जून दरम्यान सार्वजनिक विद्यामंदिर, पेण येथे यशस्वीपणे पार पडले आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत अत्यंत उत्साहात करण्यात येणार आहे. ‘पुस्तक दिंडी’ काढून, ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे औक्षण करून शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.
याच दिवशी तालुक्यातील प्रत्येक शाळेला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे विविध अधिकारी भेट देतील. नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक शिक्षक संघ, शिक्षक पालक संघ आदी समित्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Nca

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *