पनवेल शहरात घरफोडी करणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

पनवेल शहरात घरफोडी करणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना अटक
पनवेल | संजय कदम 
 पनवेल शहरातील तक्का आणि करंजाडे परिसरात घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व घड्याळ असा मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्का परिसरात आरोपी ललित शाही (वय ३३), किशोर शाही (वय २९) आणि शेरबहादूर शाही (वय ३५) यांनी संगनमत करून घरफोडी केली होती. या घरफोडीतून आरोपींनी सुमारे ६० लाख ८८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि घड्याळ चोरी करून नेले होते. तसेच करंजाडे परिसरात देखील याच आरोपींनी आणखी एक घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी तक्रार दाखल होताच पनवेल शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, गंथडे, वायकर, दिवेकर, पोलीस नाईक सम्राट डाकी, विनोद देशमुख आदींच्या पथकाने तपास करून आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा माल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.