रायगड जिल्हा परिषदेसाठी 5 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीनंतर पोलादपूर तालुक्याचा मागासलेपणाचा ठपका पुसून आगामी काळात नियोजनबध्द विकासाचे प्रयत्न सुरू करणार आहे, अशी ग्वाही भाजपा गटनेते आ.प्रवीण दरेकर यांनी देवपूर येथील छोटेखानी प्रचारसभेत दिली. पोलादपूर तालुक्याचा दोन दिवसीय प्रचार दौरा आ.प्रवीण दरेकर यांनी केला. यावेळी आ.दरेकर बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे भाजपा-राष्ट्रवादी युतीचे उमेदवार कृष्णा कदम, पंचायत समितीचे उमेदवार सुरेंद्र चव्हाण, माजी जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, सुभाष दरेकर, बाबा शेठ, कॅप्टन काशीराम चव्हाण, गणपत महाडिक, श्रीपत जगदाळे, सुरेश सकपाळ, अरुण पवार, संजय महाडिक, चंद्रकांत पवार, विठोबा महाडिक, सुरेश पवार, राजाराम उफाळे, मोतीराम महाडिक, परेश पवार, दीपक महाडिक, प्रवीण महाडिक, तालुका अध्यक्ष मंगला झाडाणे, विशाखा महाडिक, नागेंद्र राठोड यांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
पहिल्या दिवशी आ. दरेकर यांनी कोंढवी, महालगूर, फणसकोंड, पळचिळ आदी गावांचा दौरा केला. दुसऱ्या दिवशी रविवारी देवपूर, परसूले, क्षेत्रपाल, कुडपण, कोतवाल, तुरुंबे बुद्रुक आदी गावांचा दौरा केला.
यावेळी आ. दरेकर यांनी, राज्याचा विरोधीपक्ष नेता असताना महाराष्ट्र पिंजून काढला. राज्यात स्वत:चे नेतृत्व स्थापित केले. विधिमंडळाचा नेता म्हणून काम करतोय. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कोतवालसारख्या छोटया गावातून जाऊन राज्याच्या राजकारणात पोचलो. महाराष्ट्रात फिरताना विकास दिसतो. गावं, शहरे विकसित झालीत. परंतु 70 वर्ष माझ्या पोलादपूर तालुक्यावर मागासलेपणाचा ठपका आहे, ही खंत नेहमी असते. भाजपचे देशात सरकार आहे. पंतप्रधान मोदी देशाला जगात पुढे नेताहेत, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झपाटल्याप्रमाणे काम करताहेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना याचा फायदा माझ्या रायगड जिल्ह्याला, पोलादपूर तालुक्याला झाला पाहिजे. कमळ चिन्हाची उमेदवारी जिल्हा परिषदेला कृष्णा कदम तर पंचायत समितीसाठी सुरेंद्र चव्हाण यांना दिली आहे.एकदा विश्वास ठेवा आणि भाजपा-राष्ट्रवादी युतीच्या तीनही उमेदवारांना निवडून द्या. पोलादपूर तालुक्यातील गावच्या गावं ताकदीने विकसित करू, असेही आ. दरेकर यांनी आश्वासन दिले.
मुंबै बँकेमार्फत बिनव्याजी 1 लाख कर्ज
एखाद्या राज्याचा जेवढा अर्थसंकल्प असेल तेवढी मी अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेची उलाढाल आहे. कोकणात व्यवसाय करण्यासाठी तरुण पिढीने पुढाकार घ्यावा. शासनाच्या योजनाशी सांगड घालून मुंबई बँकेमार्फत लाडक्या बहिणींसाठी एक लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज देतो. ती योजनाही पोलादपूर तालुक्यात करायची असल्याचेही आ. दरेकर यांनी सांगितले.