नागोठणे येथे गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीचा पर्दाफाश; तीघे जेरबंद  

नागोठणे | महेंद्र माने
नागोठणे पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र पारखे यांच्या नेतृत्वाखाली वासगाव जंगल परिसरात धाड टाकून गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत ३० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या तिघांना पाठलाग करून अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी (२ जुलै) सायंकाळी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र पारखे यांना गुप्त बातमीदारामार्फत नागोठणे मिरानगर गावामागील जंगल परिसरात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली. विशेष पथकाने वासगाव रस्त्यालगतच्या जंगलात धाड टाकली. यावेळी झाडाझुडपांत तीन जण मांस कापत असल्याचे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
घटनास्थळी केलेल्या तपासणीत तीन प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये दोन गोवंशीय जनावरांचे अवयव व मांस, जमिनीवर ठेवलेले मांसाचे तुकडे, पाच लहान-मोठे सुरे, कानस तसेच एका झाडाला बांधलेली गोवंशीय गाय आढळून आली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश कांबळे यांनी घटनास्थळी पंचांसमक्ष मांसाचे नमुने तपासणीसाठी सीलबंद केले. या कारवाईत दोन कत्तल केलेल्या गोवंशीय जनावरांसह जिवंत गाय, शस्त्रे व अन्य साहित्य असा एकूण ३०,६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२५, ३(५), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारणा २०१५) मधील कलम ५ व ९ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ११ अंतर्गत नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय राजहंस नागदिवे हे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. या धाडसी कारवाईबद्दल नागोठणे परिसरातून सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र पारखे आणि संपूर्ण पोलिस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.