नागोठणे पोलिसांचा चेराठी-काळकाई जंगलात धडक छापा; १.२४ लाखांचा गावठी दारूचा मुद्देमाल जप्त

नागोठणे | महेंद्र माने

नागोठणे पोलिसांनी चेराठी-काळकाई जंगल परिसरात कारवाई करत गावठी हातभट्टी दारूचे दोन अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत तयार दारू व गूळ मिश्रित रसायनासह एकूण १ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील नागोठणे पोलिसांनी अवैध दारू व्यवसायाविरोधात सुरू केलेल्या मोहिमेला आणखी यश मिळाले आहे. प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चेराठी-काळकाई जंगल परिसरात छापा टाकला. यावेळी जंगलात सुरू असलेले गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे उध्वस्त करून समूळ उच्चाटन करण्यात आले.
कारवाईदरम्यान पहिल्या ठिकाणी २० लिटर तयार गावठी दारू आणि १ हजार लिटर गूळ मिश्रित रसायन असा ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दुसऱ्या ठिकाणी २५ लिटर तयार गावठी दारू आणि १ हजार ४०० लिटर गूळ मिश्रित रसायन असा ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अशाप्रकारे दोन्ही ठिकाणांहून एकूण १ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या कारवाईत सहायक फौजदार कृष्णा म्हात्रे, पोलिस हवालदार महेश लांगी, अथर्व पाटील तसेच पोलिस शिपाई स्वप्नील भालेराव यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०९/२६ व ११०/२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास नागोठणे पोलिस करीत आहेत.