नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी येत्या ८ जुलै रोजी मुंबईतील विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. शासनाने नामकरणाबाबत दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ पनवेल, उरण, नवी मुंबई आणि रायगडसह विविध भागांतून १५ हजारांहून अधिक दिबाप्रेमी व भूमिपुत्र या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती लोकनेते दिबाप्रेमी नामकरण समितीने करंजाडे येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी येत्या ८ जुलै रोजी मुंबईतील विधानभवनावर भव्य आणि ऐतिहासिक मोर्चा काढण्यात येणार आहे. विमानतळाच्या नामकरणाबाबत शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे आणि दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे दिबाप्रेमी आणि भूमिपुत्रांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, या पार्श्वभूमीवर करंजाडे येथे आयोजित पत्रकार परिषदेत लोकनेते दिबाप्रेमी नामकरण समितीने राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
पत्रकार परिषदेला माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, सामाजिक कार्यकर्ते कांतिलाल कडू, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, अतुल म्हात्रे, सरपंच अहिल्या बाळाराम नाईक, निलेश गायकवाड, सचिन केणी, बाळाराम नाईक, सुनील कटेकर, हेमराज म्हात्रे, काशिनाथ पाटील, महेंद्र नाईक, संतोष घरत, शंकर म्हात्रे, तेजस्वीनी घरत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय दोन महिन्यांत घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही.
माजी आमदार मनोहर भोईर यांनी सांगितले की, यापूर्वी विविध कारणांमुळे आंदोलनाला अपेक्षित गती मिळू शकली नव्हती. मात्र, आता ८ जुलै रोजी हजारो दिबाप्रेमी रस्त्यावर उतरून शासनाला आपल्या मागणीची ताकद दाखवतील. पनवेल, उरण, नवी मुंबई आणि रायगडसह विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक कार्यकर्ते कांतिलाल कडू यांनी आंदोलक रश्मिता पोपेटा यांच्या सहा दिवसांच्या अन्न-पाणी त्यागाच्या उपोषणाचा उल्लेख करत त्यांच्या संघर्षामुळे दिबाप्रेमींमध्ये न्यायासाठी लढण्याची नवी प्रेरणा निर्माण झाल्याचे सांगितले.
मोर्चाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून, आंदोलनाची सुरुवात पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून होणार आहे. आंदोलक रश्मिता पोपेटा यांच्या हस्ते नारळ वाढवून मोर्चाला प्रारंभ करण्यात येईल. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा कळंबोलीमार्गे मुंबईकडे रवाना होईल. आंदोलकांच्या भोजन व विश्रांतीची व्यवस्था सानपाडा येथील दत्त मंदिर परिसरात करण्यात आली आहे.
या मोर्चात पनवेल, उरण, रोहा, पेण, अलिबाग, खालापूर, कर्जत, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, वसई-विरार आणि पालघर या भागांतील सुमारे १५ हजारांहून अधिक समाजबांधव सहभागी होणार आहेत. विविध महिला संघटना, आगरी समाज संघटना, बैलगाडा संघटना, २७ गाव संघटना तसेच अनेक राजकीय पक्षांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी दिली.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे तसेच संबंधित प्रशासनाला अधिकृत निवेदन देण्यात आल्याचे समितीने सांगितले. विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.