दिवाळीच्या प्रकाशात जंगलाच्या वेदनांचा हुंदका! टोरंटच्या वृक्षतोडीविरोधात पाली ग्रामस्थांचा कँडल मार्च!

कर्जत | गणेश पवार
कर्जत तालुक्यातील पाली परिसरात टोरंट कंपनीच्या प्रस्तावित पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी दिवाळीच्या सणादिवशी कँडल मार्च काढून आपला संताप व्यक्त केला. निसर्ग आणि जंगलाशी असलेले भावनिक नाते अधोरेखित करत, वृक्षतोडीमुळे निर्माण झालेल्या दुःखाची भावना व्यक्त करण्यासाठी पाली ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक या कँडल मार्चमध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, दिवाळीसारखा आनंदाचा सण असतानाही जंगलाच्या झालेल्या नुकसानीच्या निषेधार्थ यंदा सण साजरा करण्याऐवजी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी २० तारखेला करण्यात आलेल्या वृक्षतोडीमुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पाली ग्रामस्थांनी एकत्र येत कँडल मार्चच्या माध्यमातून वृक्षतोडीचा निषेध नोंदवला. या वेळी ग्रामस्थ संतोष देशमुख यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य मृत्यू पावल्यावर ज्या प्रकारचे दुःख होते, त्याच भावना आज जंगलातील वृक्षांची कत्तल झाल्यामुळे ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाल्या आहेत. झाडे ही केवळ निसर्गाचा भाग नसून ती आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आहेत. त्यामुळे वृक्षतोडीच्या घटनेने पाली गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व्यथित झाले आहेत. दिवाळीचा सण असूनही मनात दुःख असल्याने आनंदोत्सव साजरा करण्याची मानसिकता नसल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्रामस्थ प्रसाद देशमुख यांनी या आंदोलनामागील सांस्कृतिक आणि भावनिक भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये एखाद्या कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढवल्यास जवळचा सण असला तरी नातेवाईक, मित्रमंडळी आणि आप्तेष्ट सांत्वनासाठी एकत्र येतात. त्याच भावनेतून जंगलातील वृक्षांच्या झालेल्या नुकसानीबद्दल संवेदना व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी कँडल मार्चचा मार्ग स्वीकारला आहे. सजीव सृष्टीविषयी असलेली संवेदनशीलता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता तसेच प्रकल्पाची संपूर्ण माहिती न देता हा प्रकल्प त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली. विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी करणारा कोणताही प्रकल्प आम्हाला नको, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
या कँडल मार्चमध्ये सहभागी झालेले नाशिकचे कवी वैभव मगर यांनीही वृक्षतोडीविरोधात भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दुष्काळ आणि पाणीटंचाईचे संकट असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात असल्याची विसंगती त्यांनी अधोरेखित केली. दिवाळी हा प्रभू श्रीरामांचा वनवास संपून अयोध्येत आगमन झाल्याच्या आनंदाचा सण आहे. मात्र, आजही जंगलातील झाडांचा वनवास संपलेला नाही, तर त्यांची कत्तल सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वृक्षतोडीचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी एकजूट दाखवत हा कँडल मार्च काढल्याचे त्यांनी सांगितले.
एकीकडे दिवाळीच्या प्रकाशाने घरे उजळत असताना दुसरीकडे जंगलातील वृक्षांच्या अस्तित्वावर घाला घातला जात असल्याची भावना या आंदोलनातून व्यक्त झाली. झाडांकडे केवळ लाकूड किंवा विकासकामातील अडथळा म्हणून न पाहता त्यांना सजीव सृष्टीचा अविभाज्य घटक मानण्याचा संदेश ग्रामस्थांनी दिला. टोरंट प्रकल्पाच्या वृक्षतोडीविरोधातील हा कँडल मार्च म्हणजे केवळ निषेधाचे आंदोलन नसून निसर्गाशी असलेल्या भावनिक नात्याची आणि पर्यावरण संवर्धनाच्या मागणीची जाणीव करून देणारा ठरला.